नागपूर : राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तब्बल 23 दिवसांनी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाला होता. त्यानंतर, आज नागपूरमध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी झाला असून उद्या 16 डिसेंबरपासून राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.  त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तीन प्रमख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्य सरकार विरोधकांना देखील सोबत घेऊन काम करेन, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत विचारले असता, दोनच दिवसांत खातेवाटप पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी, अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावर अजित पवारांनीच (Ajit pawar) मिश्कीलपणे उत्तर दिले. 


राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार केला आहे, आज 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्य मंत्री आहेत. आजपासून आम्ही आमचा गतीशील कारभार सुरू केला आहे. खातेवाटप कधी असा तुमचा प्रश्न असेल, तर येत्या दोन दिवसात आम्ही खाते वाटप पूर्ण करू, त्याबद्दल आमची सर्व क्लियारीटी झाली आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, आता कोणतं खातं कोणत्या पक्षाकडे आणि नेत्याकडे येणार हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचं ठरणार आहे. 


अजित पवार अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री


दरम्यान, मंत्रिमंडळ सर्व समावेशक आहे, सर्व समाजाला त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला मंत्र्यांना आधीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, अजित पवार केव्हा मुख्यमंत्री होतील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, बाजूलाच बसलेल्या अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिले, मी अडीच महिन्यासाठी ही होऊ शकतो, असे अजित पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला.


विरोधकांचा सन्मान ठेवून कामकाज होईल - अजित पवार


चहापानावर अलीकडे विरोधी पक्ष सतत बहिष्कार घालतात त्यामुळे चहापान करावा की नाही करावं असा प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री सर्वांचे खातेवाटप करतील आणि सरकार कामाला लागल्याचं दिसून येईल. विरोधक संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर सदस्यांना योग्य उत्तर दिले जातील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे, म्हणून रेटून सभागृह चालवायचा असं कधीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी आधीच ही भूमिका स्पष्ट केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील परंपरा आहे, विरोधकांचा सन्मान ठेवून कामकाज चालवलं जाते. आम्ही विरोधकांकडे ते संख्येने कमी आहे म्हणून दुर्लक्ष करणार नाही याची ग्वाही देतो, असेही पवार यांनी म्हटले. 


हेही वाचा


बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव