लातूर :  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांची भेट घेण्यासाठी आमदार-खासदारांच्या रांगा लागत आहेत. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचेही राजकीय नेत्यांकडून दाखवून दिले जात आहे. आता, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संभाजी नगर येथे भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी बुधवारी (दि.3) त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे व त्यांच्या टीमसोबत मनोज जरांगे पाटील यांच्यावरील उपचाराविषयी जाणून घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आरक्षण प्रश्नाविषयी चर्चाही केली. 


मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणाची मागणी केल्यापासून आणि आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्याहस्ते आज जालना येथे त्यांच्या छत्रपती भवन या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देखील त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करताना, आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे म्हटले. 


गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा


मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर, मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मनोज जरांगे पाटील यांच्यावर नेमलेली एसआयटी चौकशी रद्द करावी अशी मागणी आमदार धिरज देशमुख यांनी सरकारकडे केली आहे.


दसरा मेळाव्याला या, जरांगेचं आवाहन


ते पुढे म्हणाले की, कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा घेत आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या. दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका, अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची नावे सांगा. सर्व नेत्यांना सांगतो की आडवे पडू नका, गप्प राहा. कुठे इकडे, तिकडे मेळावे असतील तर तिकडे जाऊ नका. नारायणगडावर होणारा दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही, या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.