Raosaheb Danve On Uddhav Thackeray: शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आलं आहे की, बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करू नये. मत मागायची असल्यास आपल्या वडिलांचा फोटो लावून मत मागावे. आता यावरूनच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. दानवे म्हणाले आहेत की, ''ते (उद्धव ठाकरे) म्हणतात आमच्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. शिवसेनेचे प्रमुख हे माझे वडील होते. त्यामुळे यावर आमचाच अधिकार आहे. असं ते म्हणतात. मात्र आता राजेशाही नाही. शिवसेनाप्रमुख हे आमच्यासाठी राजेच होते. मात्र राजाचाच मुलगा राजा होईल असं नाही. आता राजा मतपेटीतून जन्माला येतो, पोटातून नव्हे नाही.'' पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
आम्ही लहान भावाला मोठा वाटा दिला: दानवे
उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही, असं तुम्ही 2014 साली म्हणाला होता. मग आता हे पद का स्वीकारलं, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असताना ते म्हणाले की, ''106 आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. इतकं संख्याबळ असताना सरकारमध्ये जबाबदारी घेण्यास काही गैर नाही. त्यामुळे मुख्यमंत्री जर त्यांचा असेल, तर उपमुख्यमंत्री आमचा असला पाहिजे, असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे. आम्ही मानाने, सन्मानाने लहान भावाला मोठा वाटा दिला. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, आम्ही दिलेला शब्द पाळतो. बिहारमध्ये पाहिलं तर, आमचे जास्त आमदार निवडून आले आणि नितीश कुमार यांचे कमी आमदार निवडून आले. तरी आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. आम्ही ज्या पदावर आता आहोत, ते उपमुख्यमंत्री पद आम्ही महाराष्ट्रात नेहमी स्वीकारत आलो आहोत. ते संवैधानिक आहे की नाही, याचा आमच्याशी फारसा संबंध नाही.''
'म्हणून त्यांनी आपला वेगळा नेता निवडला'
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले आहेत की, ''राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्रींना आहे. त्यावर मी बोलू शकत नाही.'' दानवे म्हणाले आहेत की, ''राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे. त्यांनी बंडखोरी केली नाही, ना आम्ही केली. त्यांच्या शब्दात सांगितलं तर त्यांनी उठाव केला. राज्यात 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी जनादेश भाजप-शिवसेनेला मिळाला होता. मात्र दगाफटका झाला. असंगतशी संगत केली. काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. हे जनता आणि त्यांच्या आमदारांना आवडले नाही. म्हणून त्यांनी आपला वेगळा नेता निवडला.''