सांगोला : ड्रायव्हींग लायसेन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, अशी शेरेबाजी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगोला येथील कार्यक्रमात केली. यावेळी त्यांनी बोलण्याच्या भरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यावरही शेरेबाजी केली. तर गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.


गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसेन्स लागते हे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केलं तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सोडल्याची शेरेबाजी गुलाबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केली. आज सांगोला येथील शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते.
        
भाजपची निवडणुकीनंतर दगाबाजी 
भाजपने निवडणुकीनंतर दगाबाजी केली आणि दोन महिने आघाडीच्या आमदारांची हे हॉटेल ते हॉटेल अशी फिरस्ती चालू होती. यातच पहाटेचा शपथविधी झाल्याने सगळेच चिंतेत असताना शरद पवार यांनी आपले ब्रम्हास्त्र काढले आणि आज मेरे गाडीने बैठं जा म्हणत पुन्हा सगळे गोळा केले आणि अखेर हे सरकार बनल्याचे किस्सा गुलाबराव पाटील यांनी सांगितला. सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवर टोलेबाजी करताना आता 50 हजार सापडले आली ईडी असे झालंय. ही ईडी म्हणजे आपल्या जिल्ह्यातील एलसीबी पोलीस आहे, असा टोला लगावला. शिवसेनेला जेलचे काय नावीन्य, शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल असे सांगत आम्ही ईडीला घाबरत नसल्याचा टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी टीका करण्यापूर्वी कधी कापसाची बोन्डे, ऊस, कपाशी, केळी कधी पाहिली का? असा सवाल करीत आज ते कमी मदत मिळाल्याची टीका करीत आहेत असा टोला लगावला.