सोलापूर : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यात सध्या भाजपचे कमळ जोरदार खुलत आहे. त्यातच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा भाजपा प्रवेश होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत वर्षा बंगल्यावर बैठक झाली असून लवकरच त्यांचा भाजपा (BJP) प्रवेश होणार असल्याचे समजते. त्यातच, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात भेट देत भाषणही केलं आहे.

Continues below advertisement

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ऑपरेशन लोटस सुरू असून सोलापूर जिल्ह्यात दिवाळीचे अजून फटाके फुटतील, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या भेटीनंतर दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने दिवाळीचे राजकीय फटाके सध्या फुटत आहेत ते पुढेही असेच फुटत राहतील असे संकेत पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी दिले. सांगोला येथे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात पालकमंत्री गोरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गोरे यांनी हे राजकीय संकेत दिले आहेत. दोनच दिवसापूर्वी जिल्ह्यातले चार माजी आमदार पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाच्या तयारीत असताना आता पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि सध्या शिवसेना उबाठा पक्षात असणारे माजी आमदार दीपक साळुंखे हे देखील भाजपाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज सांगोल्यात एका कार्यक्रमाला आले असता गोरे यांनी साळुंखे यांच्या कार्यालयाला भेट दिली. 

दीपक साळुंखे हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साळुंखे यांनी ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. या तिरंगी लढतीत साळुंखे यांना 50 हजार मते मिळाली होती. आता साळुंखे हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलेले ऑपरेशन लोटस सोलापूर जिल्ह्यातील अजून किती पक्ष मोकळे करणार हे दिवाळीनंतर लवकरच कळणार आहे.

Continues below advertisement

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे बबन शिंदे, मोहोळचे यशवंत माने आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही एक मोठी खेळी मानली जात आहे. त्यात, आता दीपक साळूंखे यांचेही नाव जोडले जात आहे. 

हेही वाचा

बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया