संभाजीनगर : बीडमध्ये ओबीसी समाजाचा मोठा मेळावा संपन्न झाला असून ओबीसी नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी थेट नाव घेत महायुतीमधील भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे, राजकीय वर्तुळात या टीकेचे, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमधील वेगळेपणाचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यावरुन, आता माजी विरोधीपक्षनेते आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी मंत्री भुजबळ यांना सवाल केला आहे. मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग मंत्रिमंडळात का रहावं, असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्याचं सूचवलं आहे. तसेच, भुजबळ हे जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो, असेही त्यांनी सूचवले. 

Continues below advertisement

महाराष्ट्रात जातीय वाद नाही झाला पाहिजे. आपल्याला समृद्ध परंपरा आहे, दोन्ही बाजूने विखारी वक्तव्य होऊ शकतात. तुमचा जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे, तर मग मंत्रिमंडळात का रहाव? मंत्र्यांचा राग आहे तर मंत्रिमंडळात का राहाव? मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध म्हणजे हा दुपट्टीपणा आहे. नेतृत्व करणाऱ्या लोकांचा एक राजकीय बुरखा समोर आला आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. तसेच, राजीनामा देण्यासंदर्भात त्यांना सूचवलं आहे. 

जामीन कधीही रद्द होऊ शकतो

छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळ निर्णयाचा तिटकारा आहे, तर मंत्रिमंडळात गेल नाही पाहिजे, तिकडे ढुंकूनही नाही पाहिलं पाहिजे. यामागे राज्य सरकार तर खेळ करत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील नेतृत्व करणाऱ्या लोकांचा उद्देश दिसतो. कारण, सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषण हे देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यांना जेलमध्ये भाजपने टाकले. याच भाजपच्या कृपेने ते जामिनावर आहेत. जामीन कधी ही रद्द होऊ शकतो, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजे आणि प्रश्नांना उत्तरे द्यायला हवेत. विखे मनाने करतात असे काही नाही. विखे विखारी आहेत तर मग तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता ? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement

भुजबळ  वडेट्टीवर गळ्यात गळे घालून होते

हे वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आहेत, कोणत्या बाजूने मत व्यक्त केले. बाजूने की विरोधात हे माहित नाही, राजकीय पक्षाचे लोक दोन्ही बाजू घेतात. राजकीय पक्ष एकांगी बाजू घेत नाही. विजय वड्डेटीवार आणि भुजबळ खांद्याला खांदा आणि आणि गळ्यात गळा घालून बोलत होते, त्यांना ते आता वाईट वाटत त्याला काय करणार ? असेही मेळाव्यातील युतीच्या अनुषंगाने दानवे यांनी म्हटलं.  

ठाकरे बंधूच मराठीचा आवाज उठवतात

राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले ते सत्य मत आहे. राज ठाकरे म्हणजे मनसे आणि त्यांच्याच कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, याचा अर्थ या राज्यात मराठीचा आवाज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उठवतात. मराठीचा आवाज बाकी कोण उचलतो?. राज ठाकरे आज उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणातून मागील काही दिवसांच्या भूमिकेपासून मराठी माणूस एकजुटीची भूमिका हळूहळू पुढे जात आहे. दिवाळीच्या सणाला मराठी अस्मिता उजळवून टाकणार, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.