मुंबई : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी मुंबईतील अनाथ आश्रमात जाऊन येथील लहान मुलांसमवेत आज दिवाळीचा दिवस साजरा केला. ही मुलं आहेत, त्यांना आई-वडील माहिती नाहीत तर जातीचा विषयच येत नाही. जातपात, धर्म आपल्या स्वार्थासाठी त्या भिंती उभारत असतो. पण, पुढच्या पिढीला चांगला संदेश द्यायला पाहिजे. आम्ही ऑलरेडी लीडर्स आहोत, आम्हाला लोक फॉलो करतात. आम्ही त्यांच्यासाठी चांगला संदेश दिला पाहिजे, असे पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटले. तसेच, बीडमधी ओबीसी समाजाच्या (OBC) मेळाव्याला अनुपस्थितीबाबतही त्यांनी सांगितलं. तर, छगन भुजबळ (Chhagan bhujbal) आणि धनंजय मुंडेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं. 

Continues below advertisement

बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा संपन्न झाला. सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाला विरोध करत येथील मेळाव्यातून ओबीसी नेत्यांनी आक्रमक भाषणे केली. मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विखारी शब्दात टीका केल्याने राजकीय वर्तुळात या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. तर, धनंजय मुंडेंनी देखील आपल्या स्टाईलने ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं. त्यावर, आता पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बीडमधील मेळाव्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मला पाहायला वेळ मिळाला नाही, मी भाषणं थोड्या वेळाने पाहीन. शिवाजीराव कर्डिले साहेब आमचे अचानक वारले, माझे त्यांच्या परिवाराबरोबर इतके जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. भुजबळ साहेबांनी यापूर्वीही असे मिळावे केले होते, त्यांची बाजू त्यांनी मांडली असावी, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी ओबीसी मेळाव्यावर दिली. तर, मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, मी भाषण पाहिले नाही, एवढीच प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली. 

Continues below advertisement

धनंजय मुंडे यांनी आज केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. अंगावर आले की शिंगावर घ्या, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर, पकंजा मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही भाषणावर मी बोलत नाही. बोलू शकते पण मी बोलत नाही. मी दुसऱ्यांच्या भाषणावर कधी टिपा-टिपणी केली नाही. ते चांगले वक्ते आहेत, काय चांगले बोलले असेल ते सांगा, असे पंकजा यांनी म्हटले.  

निवडणुकांत फटाके फुटतील

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच ना, आता निवडणुका म्हणजे फटाके फुटणार, आरोपांचे फुटणार, प्रत्यारोपांचे फुटणार, शब्दांचे फटाके फुटतील, असे पंकजा मुंडेंनी म्हटले. 

हेही वाचा

मग मंत्रिमंडळात का राहता? भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; अंबादास दानवेंचा इशारा