सोलापूर : सगेसोयरे व इतर मागण्यासाठी गेले पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)  यांनी पुन्हा अंतरवली सराटी (Antarwali Sarati)  येथे आमरण उपोषण करत आहेत.  एकीकडे जरांगेंची तब्येत खालावत असताना आता उद्यापासून ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याने पुन्हा एकदा या भागातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. चळवळीतील कार्यकर्ता अशी मूळ ओळख असणारे लक्ष्मण हाके हे सुरुवातीला राज्य मागास आयोगाचे सदस्य होते.  मात्र मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी शासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा देऊन ओबीसी चळवळीचे काम सुरु केले. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते केले होते .आज लक्ष्मण हाके यांनी ABP माझाशी संवाद साधताना याबाबत आपली भूमिका मांडली . 


अंतरवली सराटी हे सत्ताधाऱ्यांचे आवडीचे गाव असावे म्हणूनच राज्यातील 12 कोटी जनतेची जबाबदारी असणारे शासन  येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे लाड करीत आहे . त्याचवेळी ओबीसी आरक्षण बचावासाठी आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने करूनही शासनाने त्यांच्याकडे कधी ढुंकून देखील पहिले नाही असा आरोप हाके यांनी केला . कायम ओबीसींना हे सरकार दुय्यम वागणूक देत असल्याने मी आता अंतरवली सराटीमध्येच आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे हाके यांनी सांगितले. या गावाचा त्यासाठी मला आग्रह होत असून आम्ही सनदशीर मार्गाने येथे उद्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्याचे त्यांनी सांगितले . यासाठी परवानगी मागणारा अर्ज देखील दिला असून परवानगी देऊ अथवा न देऊ दे आम्ही आमच्या घटनेने दिलेल्या अधिकारानुसार हे आमरण उपोषण करणार असून यात आमचा जीव गेला तरी हरकत नसल्याचा दावा हाके यांनी केला. आपल्याला अंतरवली येथून अनेक ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्यांचे आंदोलनासाठी फोन येत असून संपूर्ण मराठवाड्यातील ओबीसी तरुण या आंदोलनात सहभागी होईल असा दावा त्यांनी केला . 


स्वार्थासाठी आरक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे : लक्ष्मण हाके


आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसून आरक्षण देताना त्याची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण पाहून आरक्षण दिले जाते. अशा मागास समाजाचा हा हक्क टिकला पाहिजे या भूमिकेतून आम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण उपोषण करत असल्याचे सांगितले. मराठा व ओबीसी यात संघर्ष वाढला तर ती शासनाची जबाबदारी असून त्यांनी त्यांना हे समजावून सांगणे आवश्यक असल्याची टीका हाके यांनी केली.आरक्षण म्हणजे काय यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 650 पानांचा निकाल दिलेला आहे . हे सर्व हे राजकारणी जरांगे याना का समजावून सांगत नाहीत, ते या वास्तवापासून का दूर पळत आहेत असा सवाल हाके यांनी केला . दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्व सामाजिक अभ्यासक , साहित्यिक , ज्येष्ठ राजकारणी ज्यांना महाराष्ट्राचा पोत माहित आहे असे जाणते राजे देखील जरांगे यांच्या चुकीच्या भूमिकांसमोर मूग गिळून गप्पा असल्याचा आरोप हाके यांनी केले . या सर्व जेष्ठ मंडळींनी पुढे येऊन जरांगे याना समजावून सांगणे आवश्यक असताना हे स्वार्थासाठी आरक्षणाचा खेळ खंडोबा करीत असल्याचा आरोपही हाके यांनी केला . 


जीव गेला तरी चालेल, पण गप्प बसणार नाही : लक्ष्मण हाके


आपलं आंदोलन हे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी असून माझ्या मागे ओबीसी समाजाच्या 350 जातीतील तरुण उभा असल्याचा दावाही हाके यांनी केला . स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही ओबीसींना 1993  सालापासून आरक्षण मिळू लागले . त्यातही पंचायत राजमधील आरक्षण गेले आहे . अशात जर हे आरक्षण हिरावून घेतले जाणार असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नसून आमचा जीवही गेला तरी चालेल मात्र आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही आता जीव असे पर्यंत लढणार असे हाके यांनी सांगितले . आपल्या आंदोलनामागे राज्यातील बारा बलुतेसार , अठरा पगड जाती आणि ओबीसी मधील लाखो तरुण उभे असून उद्यापासून कोणत्याही परिस्थितीत अंतरवली सराटी येथून आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचे हाके यांनी सांगितले .