बीड : लोकसभा मतदारसंघात यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मूळ गाव हे बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यात त्यांचे दौरे आणि मराठा आरक्षणासंदर्भातील अनेक बैठका होत असतात. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा समोर येत असून भाजपा उमेदवारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत. तर, पकंजांविरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत. बजरंग सोनवणे (bajrang Sonavane) हे मराठा समाजाचे असून बीडच्या राजकीय मैदानात मराठा आरक्षणामुळे तणाव पाहायला मिळत आहे. तर, पंकजा मुंडेंनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. आता, पंकजा यांच्या प्रचारासाठी उतरलेल्या आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.
पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांची मराठा बांधवांनी दुसऱ्यांना गाडी अडवली. तसेच, यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आमदार महोदयांना गावात येण्यास विरोधही केला. येथील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा प्रचार करण्यासाठी गेलेले आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी माजलगाव तालुक्यातल्या वांगी गावात पोहोचल होती. यावेळी, मराठा बांधवांनी सोळंके यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके हे लऊळ गावामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी बैठक सुरू असताना मराठा बांधवांनी लोडमध्ये देखील सोळंके यांना विरोध केला होता. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आमदार प्रकाश सोळंके यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोर जावे लागलं आहे.
दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांचं घरही मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, काही समाजकंटकाकडून जाळण्यात आलं होतं. त्यावेळी, आमदार सोळंके यांनी संताप व्यक्त केला होता. आता, पुन्हा एकदा निवडणुकींच्या तोंडावर मराठा समाजाच्या रोषाचा सामना काही भाजपा व सत्ताधारी पक्षातील नेत्यांना करावा लागत आहे.
सोनवणेंची मुंडे भगिनींवर टीका
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातल्या बीड सांगवी या गावात प्रचार सभा घेतली असून यावेळी बीड सांगवी गावात बजरंग सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, प्रचारसभेत बोलताना बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली.धनंजय मुंडे भाषणातून सांगतात पंकजा मुंडे खासदार झाल्यावर बीड जिल्ह्याचा विकास करतील, मग गेली दहा वर्षे पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये होत्या का, त्यांना विकास का करता आला नाही, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तर प्रीतम मुंडे खासदार असताना त्यांनी धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षणावर सभागृहात एकदाही आवाज उठवला नाही, असं म्हणत सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्यावर देखील टीका केली.
संबंधित बातम्या
मोठी बातमी : मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी