Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी दिली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये (Nashik News) जोरदार प्रचारही केला जात आहे. मात्र महायुतीत (Mahayuti) अजूनही  नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. महायुतीतून नाशिकच्या जागेसाठी दररोज नवनवीन इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. आता अचानक भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. 


नाशिकच्या जागेवर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. तर भाजपकडून दिनकर पाटील (Dinkar Patil) हे इच्छुक आहेत. त्यातच काल शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे अचानक नाशिक दौऱ्यावर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत गिरीश महाजनांच्या गुप्त बैठका


एका हॉटेलवर गिरीश महाजनांनी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना महाजनांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय बनला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक सभेचं नियोजनही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 


भाजपचे पदाधिकारी छगन भुजबळांच्या भेटीला 


तर दुसरीकडे भुजबळ फार्मवरही मोठ्या हालचाली सुरु आहेत. नाशिक जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी भुजबळ फार्मवर छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले होते. दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार (Bharti Pawar), नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav), माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) आणि इतर पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.  भुजबळांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळांची चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय बोलणे झाले हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिकच्या जागेवरून हाय व्होल्टेज ड्रामा! शांतीगिरी महाराजांनी भरला शिवसेनेकडून अर्ज, इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे म्हणाले...


पंकजा मुंडेंनी नाशिक लोकसभेबाबत वक्तव्य घेतलं मागे, म्हणाल्या, नासमझ लोकांनी वेगळाच अर्थ लावला; मनातली सल बोलून दाखवत कोणावर साधला निशाणा?