Maharashtra Politics : पंढरपूर : सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात मराठा (Maratha) समाजाकडून निर्णय घेतला जात असून याचा धोका आघाडीलाच बसणार याचे थेट संकेत देत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिले आहेत. मराठा समाजाने यावर पुनर्विचार करण्याचं आवाहन देखील रोहित पवारांनी मराठा समाजाला केलं आहे. सध्या मनोज जरांगे पाटील आणि शिंदे-फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या वादानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. 


'मराठा उमेदवारांची संख्या वाढली तर भाजपला  फायदा'


जरांगेंच्या आवाहनानंतर नेत्यांना गावात प्रवेश नाही, आम्हाला मत मागू नका असे फलक लावायचे आणि गावागावातून मोठ्या संख्येने उमेदवार उभे करून भाजपाला पराभूत करण्याची रणनीती आखण्यात येत आहे. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही वाराणसीमधून उमेदवाऱ्या दाखल केल्या जाणार आहेत. याचा फटका बसण्याऐवजी भाजपाला फायदाच होईल, अशी भीती आज आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. 


रोहित पवारांचं मराठा समाजाला थेट आवाहन 


रोहित पवार सोमवारी सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शेकाप नेते आमदार भाई जयंत पाटील, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, सांगोल्याचे शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ अनिकेत देशमुख उपस्थित होते. माढा लोकसभेच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांनी सांगोल्यात येऊन शेकापच्या मेळाव्याला हजेरी लावत बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे.


'आपल्यामुळे मते कोणाची फुटतात याचा विचार करा'


यापूर्वी 2019 साली कोरेगाव भीमा प्रकरण झाले आणि दोन समाजात वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीचा फायदा भाजपाला झाला होता, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता जे मराठा समाजाचे तरुण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपल्यामुळे मते कोणाची फुटतात याचा विचार करावा, असे आवाहन थेट मराठा उमेदवारांना केले. त्यामुळे आज भाजपच्या विरोधात जे उमेदवार होऊ इच्छितात त्यांनी विचार करूनच भूमिका घ्यावी असा सल्ला दिला. 


'वंचितने महाविकास आघाडीसोबत राहावं'


वंचित नेहमीच संविधान बचावासाठी पुढे राहिलेले असले तरी 2019 मध्ये त्यांचे उमेदवार जिथे-जिथे होते त्याचा फायदा भाजपाला झाला. त्यामुळे आंबेडकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या समविचारी पक्षासोबत राहावे, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. यावेळी ते लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी भाजपाविरोधात आमच्यासोबत एकत्र येतील असे रोहित पवार यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Uddhav Thackeray : अबकी बार 'चंद्रहार'! नामर्द पळून जातायत, मर्द पक्षात येतायत; डबल महाराष्ट्र केसरीच्या प्रवेशावर ठाकरेंनी दंड थोपटले