अकोला : राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असताना एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा विदर्भात पोहोचली आहे. आपल्या होमग्राऊंड असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये सोमवारी आंबेडकरांचे जोरदार स्वागत झाले. शहरातील सिदाजी महाराज मंगल कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित केले. यावेळी, भाषण करताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मनोज जरांगें यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तत्पूर्वी, आंबेडकरांनी मूर्तिजापूर आणि अकोल्यातही त्यांची जाहीर सभा झाली होती. प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे. तसेच, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनाही (Manoj Jarange) टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. 


पातूर येथील व्यासपीठावर प्रकाश आंबेडकरांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे ओबीसीतील स्थानिक नेतेही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पातूर येथील सभेतूनही प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना लक्ष्य केलं. तत्पूर्वी  मनोज जरांगे पाटील सारखा खेळ कोणीही करू शकत नाही. एक तीर मे दो निशान ही साधण्याची कला मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला होता. तर, पातूरमधील सभेतून मनोज जरांगे यांचे आभार मानले आहेत. तसेच, सर्व ओबीसी समाजानेही मनोज जरांगे यांचे आभार मानायला हवे आणि त्यांचा फोटो घरात लावायला हवा, असा उपरोधात्मक टोलाही आंबेडकरांनी जरांगे यांना लगावला. 


मी जरांगे पाटलांचे जाहीर आभार मानतो कारण आम्ही जे 40 वर्षात करू शकलो नाही ते त्यांनी 2 वर्षांत केलं. जरांगेंनी ओबीसींच्या सर्व समाजघटकांत चैतन्य आणि जागृती आणली. ओबीसींना जागं केलं म्हणून सगळ्यांनी जरांगे पाटलांचा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा, आणि विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत एक हार त्याच्यावर चढवायचा, अशा शब्दात मनोज जरांगे यांना खोचक टोलाही लगावला आहे. जरांगेची भूमिका ही चीत भी मेरी और पट भी मेरी असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, ओबीसींच्या आरक्षणाला धोका नाही. कारण, ओबीसींचा राजकीय जीव राज्यातील 169 मराठा राजकीय घराण्यांच्या हाती आहे. त्यामुळे, ओबीसींची संख्या कळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार करणं टाळल्याचं दिसून येत आहे. मी प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करतो, त्यांच्या टीकेवर मी कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी अशी भूमिका का बदलली हे मला माहिती नाही, असेही जरांगेंनी म्हटलं होतं. 



हेही वाचा


राज ठाकरे एकाचवेळी मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या रडारवर, लक्ष्मण हाके म्हणाले, तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मलात का?