Manoj Jarange on Girish Mahajan, Dharashiv : "माझ्याकडे जामनेरचे लोक आले होते. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मतदारसंघातले होते. गिरीश महाजनांना कवाकवा राहून राहून वळवळ होती. त्यांच्या ध्यानात नाही की, त्याच्या मतदारसंघात 1 लाख 36 हजार कुणबी मराठे आहेत. शेवटी कुणबी जरी असले तरी मराठे आहेत, आमचे पाहुणे आहेत. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले होते. मला म्हणाले, याचा टांगाच पलटी करतो", असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलाय. ते धाराशिव (Dharashiv) येथील शांतता रॅलीत बोलत होते.
मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार, मनोज जरांगेंचा शब्द
धाराशिव शहरातील हजरत शमशुद्दीन गाझी दर्गाला मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी चादर चढवली. विविध पक्षातील मुस्लिम समाज बांधव आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येत पाठिंबाचे पत्र मनोज जरांगे पाटील यांना दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी मुस्लिम समाजातही आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
धनगर आरक्षणासाठी उपोषणकर्त्यांना मनोज जरांगेंची भेट
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाला बसलेल्या दोन तरुणांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. लातूर शहरात मागील बारा दिवसांपासून या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांची प्रकृती खालावली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल झाले होते.
मनोज जरांगे लांडगा, कळपात शिरुन त्यांनाच फस्त करेल; लक्ष्मण हाकेंचा इशारा
राज्यात मराठा आणि धनगर समाजाची एकत्रित मोट बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हा लांडगा असून तो धनगर समाजाच्या कळपात शिरुन मेंढ्या फस्त करेल. त्यामुळे धनगर बांधवांनी मनोज जरांगे यांच्यापासून सावध राहावे, असा धोक्याचा इशारा लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.