Mani Shankar Aiyaar Statement On Pakistan : नवी दिल्ली : देशात एकिकडे लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. वारसा कर आणि भारतीयांबद्दल वर्णद्वेषी वक्तव्य करणारे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्यानंतर आता एका काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांनी पाकिस्तानबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतानं पाकिस्तानला सन्मान दिला पाहिजे, अशी सूचना काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी केली आहे.  


लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू ठेवत अय्यर यांनी असंही म्हटलं आहे की, जर भारतानं पाकिस्तानचा आदर केला नाही, तर पाकिस्तान अणुबॉम्बनं हल्ला करेल. अय्यर यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू आहे. एका मुलाखतीत बोलताना मणिशंकर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं आहे. अय्यर यांची ही मुलाखत एप्रिल महिन्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आल्यानंतर अय्यर यांची जुनी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याचं सांगितलं जात आहे. ट्विटरवर अय्यर यांचं वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मणिशंकत अय्यर यांचं पाकिस्तानवरील प्रेम लपलेलं नाही, अस नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे. 






जर पाकिस्तानचा आदर केला नाहीतर ते भारतावर अण्वस्त्र हल्ला करतील : मणिशंकर अय्यर 


शेजारी देशाकडे अणुबॉम्ब असल्यानं भारतानं पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असं मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. जर आपण त्यांचा आदर केला नाही तर ते भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार करू शकतात, असंही ते म्हणाले. 


अय्यर म्हणाले की, पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत हे भारताने विसरू नये. पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे म्हणून आम्ही चर्चा करणार नाही, असं सध्याचं सरकार का म्हणतंय, हे मला समजत नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा भारत अहंकारानं आपल्याला जगात लहान दाखवत आहे, असं पाकिस्तान समजेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील कोणताही वेडा या बॉम्बचा वापर करू शकतो, असं ते म्हणाले. 


मणिशंक अय्यर यांचा पाकिस्तानशी चर्चेचा आग्रह 


व्हायरल क्लिपमध्ये अय्यर यांनी भारतानं पाकिस्तानशी संवाद सुरू करायला हवा, यावर भर दिला. ते म्हणतात की, तुम्हाला पाहिजे तितकं काटेकोरपणे बोला, परंतु किमान संभाषण सुरू करा. गेल्या 10 वर्षांत पाकिस्तानशी चर्चा पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे पाकिस्तान अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करू शकतो, भारतानं मसल पॉवर दाखवण्याऐवजी बोलायला हवं, असंही संभाषणात म्हटलं जातं, तेव्हा अय्यर म्हणतात, जेव्हा पाकिस्तानकडे मसल पॉवर नसेल तेव्हाच मसल पॉवर दाखवा. अय्यर इथेच थांबले नाहीत, ते म्हणालेत की, त्यांची (पाकिस्तानची) मसल पॉवर (न्यूक्लियर बॉम्ब) कहूता (इस्लामाबाद) येथे ठेवली आहे.