Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत घडामोडींना वेग आला आहे. यातच पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी देशातील 22 विरोधी पक्ष नेत्यांना  (22 Opposition Leaders) एकत्र येण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रात ममता यांनी विरोधी पक्ष नेत्यांना 15 जून रोजी बैठकीसाठी दिल्लीत बोलावले आहे.


ममता बॅनर्जी यांनी 15 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह 22 विरोधी नेत्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ममता यांनी लिहिले आहे की, भारतात लोकशाही पूर्णपणे संपत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. कारण यातूनच पुन्हा एकदा लोकशाही वाचवता येईल.


ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, एमके स्टॅलिन, के चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, शरद पवार, अखिलेश यादव, सीताराम येचुरी आणि लालू यादव यांच्यासह 22 नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना बोलावण्यात आलेले नाही.


कधी होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक?


केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तेव्हा राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यात सहभागी होतील आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होईल, त्यानंतर देशाच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होईल.


प्रथम पसंती चिन्हांकित करणे आवश्यक 


मतदारांना उमेदवारांच्या संख्येच्या आधारे पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. जर मतदारांनी त्यांची पहिली निवडणूक चिन्हांकित केली नाही आणि उर्वरित निवडणुकांवर चिन्हे लावली, तर हे मत अवैध मानले जाईल. म्हणजेच प्रथम पसंती भरणे आवश्यक असेल.