West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आज बंगाल सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आता राज्यशासित विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे विधेयक लवकरच विधानसभेत मांडण्यात येणार आहे.


पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी बैठकीनंतर सांगितले की, "बंगाल मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव लवकरच विधानसभेत विधेयकाच्या रूपात मांडण्यात येईल." आतापर्यंत राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती होते.


दरम्यान, बंगालमधील राज्यपाल कार्यालय आणि ममता सरकारमधील वाद अनेकदा चर्चेत राहिले आहेत. राज्यपाल जगदीप धनखर हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी आज राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर हावडा महानगरपालिकेच्या (एचएमसी) विभाजनाशी संबंधित विधेयक मंजूर न केल्याबद्दल टीका केली. राजभवन कार्यालयाने यामध्ये अडथळे निर्माण केले असा आरोप त्यांनी केला आहे.


हावडा म्युनिसिपल कॉर्पोरेशन (सुधारणा) विधेयक 2021, जे बल्ली नगरपालिकेला HMC च्या अधिकारक्षेत्रातून वेगळे करण्याचा प्रस्ताव ठेवणारे आहे. हे विधेयक राज्य विधानसभेने गेल्या वर्षी मंजूर केले होते. धनखर यांनी मात्र अद्याप या विधेयकाला संमती दिलेली नाही. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारकडे अधिक माहिती मागवली आहे.


दरम्यान, केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद देखील सर्वाना माहित आहेत. अलीकडेच कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. तर या वर्षी जानेवारीमध्ये मुख्यमंत्री ममता यांनी राज्यपाल जगदीप धनखर यांना ट्विटरवर ब्लॉक केले होते. बंगालच्या राज्यपालांच्या ट्विटमुळे त्या नाराज झाल्याने त्यांनी जगदीप धनखर यांना ब्लॉक केलं असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.