Congress Steering Committee : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (26 ऑक्टोबर) सुकाणू समितीची घोषणा केली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी यांच्यासह CWC च्या जवळपास सर्व सदस्यांचा सुकाणू समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खर्गे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच परंपरेनुसार CWC च्या सर्व सदस्यांनी त्यांचे राजीनामे त्यांच्याकडे सुपूर्द केले.
काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीनंतर CWC विसर्जित केली जाते आणि CWC च्या जागी पक्षाचे कामकाज चालवण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन केली जाते. AICC सरचिटणीस संघटना केसी वेणुगोपाल म्हणाले, "सर्व CWC सदस्य, AICC सरचिटणीस आणि प्रभारींनी आपले राजीनामे कॉंग्रेस अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत."
मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात अधिकृतपणे पक्षाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी शशी थरूर यांचा पराभव करणाऱ्या खर्गे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले. काँग्रेसचा वारसा पुढे नेणे ही अभिमानाची बाब असल्याचे यावेळी खर्गे म्हणाले.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीच्या ते अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 29 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर असणार आहे. खर्गे दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
दरम्यान, आता काँग्रेसमध्ये खर्गे राज सुरू झाले आहे. विजयानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच नेत्यांना संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी या पदावर नेल्याबद्दल आपल्या पक्षाचे आभार मानले आणि सोनिया गांधींची ब्लू प्रिंट पुढे नेण्याचे काम केले जाईल असे सांगितले. अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या भाषणात खर्गे म्हणाले की, "माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे. एका सामान्य कामगार, कष्टकऱ्याच्या मुलाची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून त्यांचा सन्मान केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. ब्लॉक अध्यक्षापासून सुरू झालेला प्रवास तुम्ही इथपर्यंत नेला आहे. आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.''