Congress President Election 2022: राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड पाठोपाठ आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनेही खासदार राहुल गांधी यांना पक्ष अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. आज पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय शेजारी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. जो एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

  


आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. यानंतर हा ठराव सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला. 


मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate )  यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव नाना पटोले यांनी मांडला. हा ठराव देखील सर्व प्रदेश प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला. 


छत्तीसगड काँग्रेसनेही राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला 


रविवारी छत्तीसगड काँग्रेसनेही राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच छत्तीसगड काँग्रेसनेही प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेसच्या भावी अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि एआयसीसीमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचे अधिकारही दिले आहेत. हा ठराव मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मंडल होता. जो मंजूर करण्यात आला आहे. यावेळी बोलताना बघेल म्हणाले की, राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर पुन्हा बसवण्याचा प्रस्ताव मी ठेवला आहे. एआयसीसीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना करावे, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. मोहन मरकम यांनी एआयसीसी (AICC) शिष्टमंडळ, प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांना कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला. यालाही पाठिंबा देण्यात आला असून दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. तत्पूर्वी राजस्थान आणि दिल्ली राज्य समित्यांनीही राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. त्यांच्या या यात्रेने पक्षातिल कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे.