Mahayuti Seat Sharing : मुंबई : लोकसभा निवडणुकाचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. इथे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या मात्र, पक्षांचा जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीय. राज्यात सत्तेत असलेल्या जागावाटपावरुन सध्या महायुतीत चढाओढ सुरू आहे. महायुतीच्या मुंबईतल्या तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशातच मुंबई भाजप (BJP) कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. रंगशारदा येथे दुपारी एक वाजता मुंबई भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावली तातडीची बैठक बोलावली आहे. भाजपचे मुंबईतले सर्व आमदार, खासदार बैठकीला राहणार उपस्थित राहणार आहेत. अशातच आत महायुतीच्या जोडीला मनसे येण्याची शक्यता आहे. 


महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटेना झाला आहे. अशातच आता मनसेच्या एन्ट्रीनं शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपकडे लोकसभेच्या 18 जागांसाठी मागणी केली होती. पण चर्चेनंतर शिवसेना 16 जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याची माहिती मिळत आहे. अशातच मनसेच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढवलं आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून घासाघीस सुरू आहे. तसेच, वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे माजी खासदार कोण? 


1. श्रीकांत शिंदे : कल्याण
2. राहुल शेवाळे : दक्षिण मध्य मुंबई
3. हेमंत पाटील : हिंगोली
4. प्रतापराव जाधव : बुलडाणा
5. कृपाल तुमाणे : रामटेक
6. भावना गवळी : यवतमाळ-वाशिम
7. श्रीरंग बारणे : मावळ
8. संजय मंडलिक : कोल्हापूर
9. धैर्यशील माने : हातकणंगले
10. सदाशिव लोखंडे : शिर्डी
11. हेमंत गोडसे : नाशिक
12. राजेंद्र गावित : पालघर
13. गजानन कीर्तीकर : वायव्य मुंबई


मनसेच्या येण्यानं शिंदेंची गोची? 


राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार  आणि मनसेला 1-2 जागा मिळतील, अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. या बातमीवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीनं राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या संध्याकाळच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही दिल्लीला रवाना झाले आहेत.