मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी आणि महायुतीची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा देखील सुरु आहेत. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अमित शाह पुन्हा 1 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून ते मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी महायुतीच्या घटकपक्षांच्या नेत्यांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपनं 288 पैकी 150 ते 155 जागा लढवण्याची भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं महायुतीत भाजपचं मोठा भाऊ असणार हे स्पष्ट होतं. तर, राहिलेल्या 133-138 जागांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटून घ्याव्या लागणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना महायुतीमध्ये जवळपास 198 जागांवर सहमती झाल्याची माहिती दिली.
भाजप 150 जागांवर ठाम
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांची बैठक पार पडली. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची देखील बैठक झाली. भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका अमित शाह यांनी मांडल्याची माहिती आहे. तर, भाजपनं 150 जागा लढवल्यास महायुतीतील इतर दोन पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना 138 जागांमध्ये वाटप करावं लागेल.
महायुतीत 198 जागांवर सहमती?
महायुतीत 198 जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे. सध्या महायुतीमध्ये 90 जागांवर तिढा कायम आहे. आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तिढा सुटणार का हे पाहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केलं होतं. तिन्ही पक्षांचे जे आमदार आहेत त्यांच्या जागा त्यांच्याकडेच राहणार आहेत. या सूत्राचा विचार करता भाजपचे 105 आमदार आहेत, शिवसेनेकडे अपक्षांसह 50 आमदार आहेत तर अजित पवारांकडे अपक्षांसह 45 आमदारांचा पाठिंबा आहे.
आज महायुतीच्या नेत्यांची बैठक
महायुतीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात आज बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दैरा रद्द झाल्यानं महायुतीची लवकर बैठक होणार आहे.आजच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल जी चर्चा होईल ती अमित शाह यांना कळवली जाईल. त्यानंतर अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे.
इतर बातम्या :