Maha Vikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आज (23 ऑगस्ट) बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली. संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास ही बैठक पार पडेल. महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधीमंडळातील रणनीती याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता लवकरच महापालिका निवडणूक पार पडणार आहेत. याच विषयी महाविकास आघाडीची खलबतं होतील अशी माहिती मिळत आहे. 


या बैठकीतून चांगला मेसेज जाईल : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी या सगळ्यांसह आमचं ठरलं की, आज एकत्रित बैठक घेऊया. कारण अधिवेशन पहिल्या आठवड्यात दोन दिवस झालं. दुसरा आठवडा सुरु झाला आहे. विरोधी पक्ष एकत्रितपणे सत्ताधारी पक्षाच्या समोर विरोधक म्हणून जातोय. आम्ही आमची एकी टिकवण्याचा प्रयत्न करतोय, एकी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी उद्धव ठाकरेंना विनंती केल्यानंतर मी येतो संध्याकाळी असं आश्वासन दिलं. तेही त्यांच्या परीने मार्गदर्शन करतील आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही जे राहिले आहोत, त्यांच्यात एक चांगला उत्साह निर्माण होईल, एक चांगला मेसेज जाईल."


आज संध्याकाळी विधानभवनात बैठक
महाविकास आघाडीतील नेत्यांची आज संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास बैठक होणार आहे. विधानभवानात ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे देखील या बैठकीला येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधानमंडळात येतील.


शिवसेनेचे उर्वरित आमदार विरोधी बाकांवर
खरंतर शिंदे गट भाजपसोबत गेल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे उर्वरित आमदार विरोधी गटातच बसलेले आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेचे आमदारही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करताना दिसले. एवढंच नाही तर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता हा शिवसेनेचा आहे. अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाली आहे. आज महाविकास आघाडीचे नेत्यांची बैठक होणार असून पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याचं समजतं.