Chandrakant Patil Security : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत (Security) प्रचंड वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर (Police) क्राईम ब्रांचचे (Crime Branch) पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहेत. चंद्रकांत पाटील यांची गाडी ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येत आहे. राज्य पोलिसांच्या या सुरक्षेबरोबरच चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफ (CISF) या केंद्रीय सुरक्षा दलाची देखील सुरक्षा आहे. त्यामध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरु आहे. चंद्रकांत पाटील आज (12 डिसेंबर) पुण्यातील कर्वेनगर भागातील एका संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी वारजे पोलीस स्टेशनचे पन्नास पोलीस, क्राईम ब्रांचचे पाच अधाकारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (10 डिसेंबर) सायंकाळी चिंचवड इथे शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील हे चिंचवड गाव इथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला.
11 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबित
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाई अका पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी अशा एकूण 11 जणांना निलंबित केलं आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली होती.
पत्रकाराची सुटका
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात एका वृत्तवाहिनीचे पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं. रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअॅप चॅट देखील पोलिसांना सापडलं होतं, अशी माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर गोविंद वाकडेंवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या अटकेची बातमी समजताच राज्यभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या होत्या. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी गोविंद वाकडे यांला सोडून दिले आहे.
VIDEO : Chandrkant Patil Security : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, सुरक्षेत प्रचंड वाढ : ABP Majha