Maharashtra Politics: रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोकणावर आपलं विशेष लक्ष केंद्रीय केलं आहे. त्यासाठी ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्ष आमदार असलेले ठाकरेंचे विश्वासून सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणारे, निष्ठावंत सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी वारंवार केला होता. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले होते. यातूनच दळवींनी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. 


ठाकरे गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. सूर्यकांत दळवी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. 


नेमकं काय घडलं? 


कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे सूर्यकांत दळवी गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं बोललं जात होतं. स्वतः दळवींनी देखील आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. 2014 च्या निवडणुकीत रामदास कदम यांनी पक्षाविरुद्ध गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांना केला होता. त्यानंतर 2019 मध्ये आमदारकीचं तिकीट रामदास कदमांच्या मुलाला देण्यात आल्यामुळे दळवींच्या नाराजीत आणखी भर पडली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल, अशी आशा सूर्यकांत दळवींना होती. दापोली विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी दळवी यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवल्यानं दळवी यांच्या नाराजीत पुन्हा एकदा भर पडली. गेल्या काही दिवसांत ते उद्धव ठाकरे गटाच्या कार्यक्रमात दिसत नव्हते.


ठाकरेंची साथ सोडून हाती कमळ धरणारे सूर्यकांत दळवी कोण? 


तब्बल 25 वर्ष आमदारकी भूषवलेले सूर्यकांत दळवी आज भाजप प्रवेश करणार आहेत. बाळासाहेबांचा विश्वासू कडवट शिवसैनिक अशी सूर्यकांत दळवींची ओळख. 1990 साली पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरुन मुंबईतील भारत पेट्रोलियम कंपनीतील नोकरी दळवींनी सोडली आणि थेट रत्नागिरीतील दापोलीत दाखल झाले. ना राजकीय पार्श्वभूमी किंवा कोणताही अनुभव नसताना सूर्यकांत दळवींनी रत्नागिरीत खऱ्या अर्थानं शिवसेना रुजवण्याचं काम केलं. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांत दळवींनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा दबदबा वाढवला आणि पहिल्याच प्रयत्नात आमदारकीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.


1990 पासून सूर्यकांत दळवींनी सलग 25 वर्ष आमदारकी भूषवली. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा कायम ठेवण्याचं काम सूर्यकांत दळवींनी केलं. त्यांना पक्षाकडून मंत्रिपदाची संधी चालून आली होती. शिवसेना सरकारमध्ये बाळासाहेबांनी त्यांना मंत्रीपद देऊ केलं, पण मला मंत्रीपद नको, पक्षातील महत्वकांक्षी लोकांना मंत्रिपद द्या, अशी विनंती केल्यानं त्यांची मंत्री होण्याची संधी हुकली, त्यानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. 2014 साली सहाव्यांदा आमदार होऊन विजयी षटकार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण यात त्यांना यश मिळालं नाही.