Ashok Chavan on Politics : "एकेकाळचं राजकारण पाच पाच वर्षे चालायचं. आताचं राजकारण आयपीएलच्या (IPL) ट्वेण्टी ट्वेण्टी मॅचसारखं (20-20 Match) झालं असून दररोज बॅटिंग करत चौकार-षटकार मारावे लागतात. कधी कधी वाटतं कामाचा आणि मतांचा सबंध राहिलाय का?" अशी खंत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केली आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील घनसावंगी इथे 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनामधील (42nd Marathwada Sahitya Sammelan) राजकीय परिसंवादामध्ये ते बोलत होते.


' कधी कधी विचार करतो, कामाचा आणि मतांचा काही संबंधि राहिला आहे का?'


"आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास जे देशात घडतंय ते राज्यात घडतं, जे महाराष्ट्रात घडतंय ते मराठवाड्यात घडतंय, त्यात नवीन काहीच नाही. आता वेळ आलीय आयपीएलची (IPL), ट्वेण्टी ट्वेण्टी मॅचची. एकेकाळचं राजकारण टेस्ट मॅचसारखं (Test Match) होतं, पाच-पाच वर्ष चालायचं. आता रोज काहीतरी नवीनच आहे. रोज बॅटिंग करा, षटकार मारा, चौकार मारा, रोज काहीतरी नवीन विषय द्या आणि त्याचा परिणाम मतांवर होईल सांगता येत नाही. कधी कधी विचार करतो, कामाचा आणि मतांचा काही संबंधि राहिला आहे का? आम्ही कामं करतो, एवढी कामं झाली या भागात तरी असं घडतं. म्हणजे मतदानाचा आणि कामाची सांगड लागत नाही. कुठल्या दिशेने सगळं चाललं आहे? आयपीएलच्या दिशेने सगळं चालू आहे का अशाप्रकारची परिस्थिती विद्यमान राजकारणात झालेली आहे, असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं," असं अशोक चव्हाण म्हणाले.


जालन्यात 42 वं मराठवाडा साहित्य संमेलन संपन्न


जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये 10 आणि 11 डिसेंबर दरम्यान 42 वं मराठवाडा साहित्य संमेलन पार पडलं. स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. शेषराव मोहिते (Shesherao Mohite) या संमेलनाचे अध्यक्ष होते तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झालं. या संमेलनाला साहित्य क्षेत्रातील जवळपास 500 मान्यवर उपस्थित होते. मराठवाडा साहित्य संमेलनात वेगवेगळे परिसंवाद, कवी संमेलन, प्रगट मुलाखत यासह विविध साहित्य संवादाचे आयोजन करण्यात आलं होतं.


VIDEO : Ashok Chavan : आताचं राजकारण आयपीएलच्या ट्वेण्टी ट्वेण्टी मॅचसारखं, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला