Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहेत. 8 ते 10 जागांवर तिढा असल्याचं समोर आले होते. आता सत्ताधारी महायुतीमध्येही जागावाटपावरुन नाराजीनाट्य असल्याचं ऐकायला मिळतेय.  भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय गेल्या निवडणुकीत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढला. महायुतीमध्ये जागावाटपावर सध्या प्राथमिक स्वरुपावर चर्चा सुरु आहे. यामध्ये भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 असा फॉर्मुला ठरल्याचं समजतेय.  


शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या 18 खासांदारांपैकी 13 खासदार शिंदेंसोबत आहेत. पण यातील काही मतदारसंघामध्ये भाजपनं तयारी सुरु केली आहे.  महायुतीची जागावाटपाची चर्चा सध्या प्राथमिक स्वरुपात सुरु झाली आहे. यामध्ये भाजपनं 32 जागांवर दावा ठोकलाय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागू शकतं. त्यामुळे महायुतीमध्ये भविष्यात तिढा वाढू शकतो. एकनाथ शिंदें यांना विद्यमान खासदारांसोबत काही दिग्गजांसाठीही तिकिट हवं आहे. त्यामुळे शिंदेवरील दबाव वाढू शकतो. दरम्यान, महायुतीमध्ये मित्रपक्षांकडील मतदारसंघांमध्येही भाजपनं तयारी केली आहे. येथील भाजपच्या काही नेत्यांनी त्यावर दावा ठोकलाय. 


भाजपचं कोणत्या मतदार संघावर लक्ष?


रामटेक, धारिशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपनं विशेष लक्ष दिलेय. 2019 च्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक लढवली होती.  नाशिकमध्ये कमळचं हवं, असं येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय आणखी चार पाच मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचाच उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. भाजपमधील या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनीही आपल्याकडे भाजपचं अतिक्रमण नको, आपणच लढलं पाहिजे, असा अग्रह मुख्यमंत्र्यांकडे केलाय. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर दबाव वाढल्याची चर्चा आहे. 


शिवसेनेचे चार-पाच विद्यमान खासदार बदलणार? 


मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र भाजपनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे केला. कोणत्या ठिकाणावरुन कुणाला मतदारांचा कौल मिळेल? हे भाजपनं जाणून घेतलं. त्यामध्ये शिवसेनेच्या चार ते पाच विद्यमान खासदारांबद्दल मतदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आले.  उमेदवार बदलला तर शिवसेनेला जिंकण्यात अडचण येणार नाही, असे सर्व्हेतून समोर आलेय. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या काही जागा घेऊ शकते, अथवा उमेदवार बदलण्याचा दबाव असेल. विदर्भातील दोन, मुंबईतील एक, उत्तर महाराष्ट्रातील एक, पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाड्यातील एका मतदारसंघाचा समावेश असल्याचं समजतेय. 


आणखी वाचा :


काँग्रेसचं डझनभर खासदार अन् 40 आमदार भाजपच्या वाटेवार? दोन आठवड्यात होऊ शकतो पक्षप्रवेश