मुंबई/ पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी  सुनील तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती आहे. आपल्या पक्षाच्या खासदारांना संपर्क झाल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेल यांना फोन करत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातही खासदारांनी ऑफर धुडकावल्याची माहिती आहे. यासंदर्भात खासदार निलेश लंके आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे. 


निलेश लंके काय म्हणाले? 


सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो बोलतो मात्र राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही, असं निलेश लंके म्हणाले. राजकारणात कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं. घाबरुन निर्णय बदलायचा नसतो. सत्ता आल्यास सत्ता भोगायची अन् सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असं निलेश लंके म्हणाले. कुणाचीही राजकीय भेट झाली नाही, राजकीय चर्चा झालेली नाही. अधिवेशन काळात हाय बाय नमस्कार झाला. सुनील तटकरेंना भेटलो नसून खासदार देखील भेटले नाहीत, असं निलेश लंके म्हणाले. 


अमोल मिटकरी काय म्हणाले?


प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल. तुतारी गटाचे जे सात- आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांना जर खरंच आमच्यासोबत यायचं असेल तर सुनील तटकरेंसोबत संपर्क केला असेल. काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येत असतील तर स्वागत आहे. त्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील. सात- आठ खासदार येण्यासाठी इच्छूक असतील तर त्याचं स्वागत करतो. निलेश लंके तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. पक्ष जर मजबूत होत असेल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. पक्ष मजबूत झाला पाहिजे, असं अमोल मिटकरींनी सांगितलं.  दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये काही चर्चा झाली असेल तर त्या गुलदस्त्यात आहे.  ते येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं मिटकरींनी म्हटलं.  


 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या खासदारांची यादी 


1. सुप्रिया सुळे


2.  अमोल कोल्हे


3.  अमर काळे 


4. धैर्यशील मोहिते पाटील


5. सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे


6. निलेश लंके 


7. भास्कर भगरे


8. बजरंग सोनावणे 



इतर बातम्या :


मोठी बातमी: शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न? सुळे वगळता 7 खासदारांना केला संपर्क