Rajan Salvi Resigned Shivsena UBT रत्नागिरी: ठाकरे गटाचे (Shivsena UBT) रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज (12 फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. राजन साळवी गुरुवारी दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. याची परिणती राजन साळवी यांनी पक्ष सोडण्यात झाली आहे. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता.
राजन साळवी प्रचंड दुखावले गेले होते-
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. मविआ सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटाने उभे राहिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरुन ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरु होती. याचा निवाडा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी साळवी यांना कटू भाषेत सुनावले होते. तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर दरवाजे उघडे आहेत, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे राजन साळवी प्रचंड दुखावले गेले होते. हीच संधी साधून भाजप आणि शिंदे गटाकडून राजन साळवी यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु, ठाकरेंची साथ सोडायची की नाही, याबाबत राजन साळवी द्विधा मनस्थितीत होते. सुरुवातीच्या काळात त्यांचा भाजपकडे ओढा होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी चक्रं फिरवत राजन साळवी यांना आपल्याकडे खेचून घेतले होते. राजन साळवी हे शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता आणि जमिनीवर उतरून काम करणारा नेता म्हणून ओळखले जात होते. ते शिंदे गटात आल्यास कोकणात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.