Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) उमेदवारीवरुन आणि देवेन भारती (Deven Bharti) यांच्या नियुक्तीवरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Shinde Group) धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. मंगळवारी (10 जानेवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) याचे पडसाद उमटल्याचं समजतं.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. येत्या 30 जानेवारी रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातच भाजपने मागील सोमवारी तीन उमेदवार जाहीर केले. कोकण शिक्षक मतदारसंघसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबाद शिक्षक मतदारासंघ किरण पाटील आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी माजी मंत्री रणजित पाटील यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाची युती झाली आहे. मात्र जाहीर झालेल्या तिन्ही ठिकाणी भाजपचेच उमेदवार देण्यात आले आहेत.
परस्पर उमेदवारी घोषित करणं योग्य नाही, दादा भुसे यांची फडणवीसांकडे नाराजी
परंतु यावरुनच भाजप आणि शिंदे गटात धूसफूस सुरु आहे. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. कोकण आणि नाशिकची जागा शिंदे गटासाठी सोडण्याचे ठरले असताना बावनकुळे यांनी परस्पर उमेदवारी घोषित करणं योग्य नसल्याचं दादा भुसे म्हणाले. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उमेदवारीच्या घोषणेबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
देवेन भारती यांची नियुक्ती केली फडणवीसांनी, बोट माझ्याकडे दाखवलं जातंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तर दुसरीकडे नुकतीच मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांच्या नेमणूक झाली. देवेन भारती यांच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नेमणुकीचा मुद्दाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. देवेन भारती यांची नियुक्ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि बोट माझ्याकडे दाखवले जात आहे. या नियुक्तीमुळे पोलीस दलात नाराजी व्यक्त होत असल्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे लक्ष वेधलं.
फडणवीसांचे निकटवर्तीय देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त
देवेन भारती हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेन भारती यांना साईड पोस्टिंग देण्यात आली असल्याचं म्हटलं जात होतं. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर भारतींना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात पाठवण्यात आले. मविआच्या काळात भारतींना साईड पोस्टिंग देण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आलं होतं. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद आल्यानंतर देवेन भारती यांच्यासाठी पद निर्माण करुन त्यांची मुंबई विशेष पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली.