Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यानंतर आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत केलं. त्यानंतर राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची वैयक्तिक चर्चा होणार आहे.


आगामी काळात मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 


भाजपच्या अनेक नेत्यांकडून राज ठाकरेंची भेट
खरंतर काल सकाळच्या सुमारास भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. परंतु दोघांनीही या भेटीबाबतचं वृत्त नाकारलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास विनोद तावडे हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यांच्यात खलबतं झाली. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. याआधी नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का असेही तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


निवडणुकीच्या तोंडावर नवीन समीकरण?
शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे आणि भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळालं ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधानपरिषद आणि शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळालं. त्यातच गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढली आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणे जुळतात का याबद्दल चर्चा आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांना पूरक भूमिका बघायला मिळतात. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली आहे. या आधी चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि मनसेच्या गोटात काही शिजतंय का? याची चर्चा रंगली आहे.