Delhi AAP MLA Protest: दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले. आम आदमी पक्षाने दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्याविरोधात आपचे आमदार विधानसभेत धरणे आंदोलन करत आहेत. आमदारांचे हे आंदोलन रात्रभर सुरू राहणार आहे. विश्वासदर्शक ठरावही आज सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आता मंगळवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. 


आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांवर खादी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आप आमदारांच्या म्हणण्यानुसार, हा घोटाळा 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी झाला होता. त्यावेळी एलजी सक्सेना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष होते. आपने जुन्या नोटांऐवजी नव्या नोटा दिल्याचा आरोप करत हा 1400 कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटले आहे.


दुर्गेश पाठक यांनी सांगितले की, व्हीके सक्सेना यांनी रोखपालाला त्यांच्या जुन्या बेहिशेबी नोटा बदलून देण्यास भाग पाडले. खादीच्या दुकानांनी जुने चलन स्वीकारणे बंद केले होते. परंतु विनय कुमार सक्सेना यांनी रोखपालाला त्याची रोकड घेऊन नवीन नोटात बदलण्यास भाग पाडले. खादीच्या दोन रोखपालांनी घोटाळा उघड केला. पण विनय कुमार सक्सेना यांनी स्वत: त्यांच्या आरोपांची चौकशी करून रोखपालाला निलंबित केले. सीबीआयने त्यांच्या तक्रारीत कधीही त्यांचे नाव घेतले नाही. हे मनी लाँड्रिंगचे स्पष्ट प्रकरण असून या प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी आप आमदाराने केली आहे. 


नायब राज्यपालांवर आरोप करताना आप आमदारांनी या प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या रोखपालांची विधानेही प्रसिद्ध केली आहेत. त्यांना धमकावून हे काम केल्याचे रोखपाल संजीव कुमार आणि प्रदीपकु मार यादव यांनी म्हटले आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बिल्डिंग मॅनेजरच्या सांगण्यावरून घेतल्याचे त्यांनी सांगितले. यातच विनय कुमार सक्सेना यांचा दबाव असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले होते. आपने म्हटले आहे की, या घोटाळ्याबाबत नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या विरोधात चौकशी झाली पाहिजे. चौकशी सुरू होईपर्यंत त्यांना एलजी पदावरून हटवण्यात यावे. या मागण्यांबाबत आपचे आमदार दिल्ली विधानसभेच्या आवारात रात्रभर धरणे आंदोलन करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


आपची मोठी घोषणा; नायब राज्यपालांच्या विरोधात सर्व आमदार आज रात्री विधानसभेत राहणार, वाचा संपूर्ण प्रकरण
Mamata Banerjee Slams BJP: महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला, ममता बॅनर्जींचा भाजपला सवाल