Ajit Pawar on Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) निवडून आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करणार पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. ते पुण्यात (Pune) बोलत होते. 


नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. त्यातच निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांकडून सत्यजीत यांना पाठिंबा  देण्याची वक्तव्ये केली जात होती. त्यामुळे आता ही निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. सत्यजीत तांबे उद्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्याबाबतच अजित पवार यांनी सत्यजीत तांबेंना राजकीय भवितव्य पाहण्याचा सल्ला दिला आहे.


दीड महिन्यात जे झालं ते सत्यजीत तांबे यांनी मनाला लावून घेऊ नये : अजित पवार


अजित पवार म्हणाले की, " सत्यजीत यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे. त्यांना बरीच वर्षे राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. त्यामुळे सत्यजीतने या सगळ्याचा विचार करुन निर्णय घ्यावा हे माझं मत आहे. सत्यजीतने ऐकावं नाही ऐकावं हा त्यांचा निर्णय आहे. परंतु त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारांशी निगडीत असल्याने आणि काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या सेलचे प्रमुख अनेक वर्षे तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मधल्या दीड महिन्याच्या काळात काय झालं ते त्यांनी मनाला जास्त लावून घेऊ नये आणि त्यांनी काँग्रेससोबत राहावं. बाळासाहेब थोरात आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांचं त्यांनी ऐकावं. कारण वडीलधाऱ्यांचं आपण ऐकत असतो. याउपर काय करायचं हा त्याचा सर्वस्वी अधिकार आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील नाट्य


दरम्यान काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे म्हणजेच सत्यजीत तांबे यांच्या वडिलांना अधिकृत उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी अर्ज दाखल केला नाही. याउलट सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि त्यांच्या उमेदवारीला वडील सुधीर तांबे यांनी पाठिंबा दिला होता. यानंतर काँग्रेसकडून दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली. मग शिवसेनेकडून शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकात आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या रिंगणात उतरल्या. त्याचवेळी भाजपच्या गोटात कमालीची शांतता होती. भाजपने नाशिक पदवीधरच्या जागेसाठी उमेदवार दिला नाही. इतकंच नाही तर भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, पण त्यांना पक्षाकडून अधिकृत पाठिंबा मिळाला नाही.  त्यामुळे ही भाजपची खेळी असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु होती. 


सत्यजित तांबे 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी


राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला. सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्यामुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला.


संबंधित बातमी


Satyajeet Tambe : सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं, विजयानंतर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया; उद्या करणार भूमिका स्पष्ट