Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मुंबईतील वरळी (Worli) मतदारसंघात भाजपने विशेष रणनीती आखली आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) हे आज वरळी मतदारसंघात पोहोचले आहेत. त्यांच्या हस्ते युवा वॉरियर या शाखेचे उद्घाटन देखील होणार आहे.  यावेळी बोलताना तेजस्वी सूर्या यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलं. मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, BMC वरही भाजप झेंडा फडकवेल, असं म्हणत तेजस्वी सूर्या यांनी रणशिंग फुंकलं.


तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे प्रयत्न : तेजस्वी सूर्या
यावेळी संवाद साधताना तेजस्वी सूर्या म्हणाले की, "सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या निवडणुकीत तरुण प्रभावीपणे काम करतील. सत्ता कुठल्या एका कुटुंबाचा हक्क असू शकत नाही. लोकांच्या पाठिंब्याने सत्ता येते, पैशांच्या पाठिंब्याने नाही." "इथले सगळे तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तुमचे वडील किंवा कुटुंबातील कोणी मंत्री नाही, असं म्हणत नाव न घेता तेजस्वी सूर्या यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसंच मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, BMC वरही भाजप झेंडा फडकवेल, असं तेजस्वी सूर्या म्हणाले.


दोन्ही नेत्यांची राजकीय आतापर्यंतची वाटचाल
31 वर्षी तेजस्वी सूर्या हे बंगळुरु दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. विशेष म्हणजे ते भाजपचे सर्वात तरुण खासदार आहेत. 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर 32 वर्षीय आदित्य ठाकरे यांनी युवासेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. तर 2019 मध्ये त्यांनी वरळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आहे. तसंच ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे ते पहिले व्यक्ती ठरले.


सत्तांतरानंतर भाजपचं वरळीकडे लक्ष
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेना फुटली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे गट-भाजपची सत्ता स्थापन झाली. भाजप काही काळापासून वरळी, लोअर परेल आणि दादर परिसरात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान भाजपचं विशेष लक्ष आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघावर आहे. 


आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाकडे मोर्चा
तर दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी दिली. त्या दृष्टीने आशिष शेलार तयारी लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून की काय त्यांनी आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे वळवला आहे. यापूर्वी आदित्य यांच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करुन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर गणेशोत्सवात वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर पाहायला मिळाले होते. तर काही दिवसांपूर्वी वरळीतील जांबोरी मैदानात दीपोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता.


VIDEO : BJP Mission Worli : भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात