Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून, त्यांच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान यावरच काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. "राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचं शरद पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे. मात्र राजकारणातील पवारांचे मानाचे स्थान कायम राहिल," अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. 


शरद पवारांच्या निर्णयावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्याची बातमी मी आत्ताच ऐकली आहे. तर पुढील तीन वर्षे ते राजकारणात सक्रीय असतील असे त्यांनी सांगितले आहे. तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण काही जरी विचार केला तरीही राजकारणातील पवारांचे मानाचे स्थान कायम राहिल. तसेच त्यांच्या अंर्तगत पक्षातील बदलाचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे चव्हाण म्हणाले. 


तर पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. आता आमच्या काँग्रेस पक्षात सोनिया गांधी या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. पण आता त्यांच्या जागी मल्लिकार्जुन खर्गे हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहे, पण त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम झाला नाही.


अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया...


दरम्यान यावर बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, शरद पवारांनी घेतलेला निर्णय त्यांच्या पक्षाचा अंर्तगत विषय आहे. पण पवारांसारख्या एका अनुभवी नेत्याने असा निर्णय घेण निश्चितच खटकणारी बाब आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पातळीवर सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात फळी उभी करत असताना शरद पवार यांची निवृत्ती न पटणारी बाब आहे. 


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची केलेली घोषणा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना पटलेली नाही. त्यामुळे अजूनही मुंबईतील वायबी सेंटरच्या बाहेर अनेक कार्यकर्त्यांनी त ठिय्या मांडल्या असून, त्यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय नागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sharad Pawar Retirement: सुप्रिया तू बोलू नको, कार्यकर्त्यांनाही खडसावलं, झापलं, अजित पवारांचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा!