Chhatrapati Sambhaji Nagar News : मोठमोठे लोक ईडी, सीबीआयच्या फेऱ्यात अडकत आहेत. त्यात तुमचाही नंबर लागू शकतो, असा इशाराच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. शुक्रवारी (19 मे) जिल्हा परिषदेत कामाची आढावा बैठक झाली. या बैठकीत अनेक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी असल्याचा मुद्दा सत्तार यांनी उपस्थित केला. तर पैसे मागणाऱ्या अधिकारी ईडी, सीबीआयच्या फेऱ्यात अडकू शकतात असं वक्तव्य सत्तार यांनी या बैठकीत केले. त्यामुळे बैठक संपल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये ईडी, सीबीआयचीच चर्चा पाहायला मिळाली.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सिल्लोड, सोयगाव पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या विकासकामांची आढावा बैठक कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात शुक्रवारी घेतली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, अब्दुल समीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभाग आणि अर्थ विभागाला मंत्री सत्तार यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या कंत्राटांमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांनी टक्केवारीची मागणी केली होती. यासाठी त्यांचे कंत्राटदेखील त्रुटी काढत थांबवण्यात आले होते. यावरुन यापूर्वी देखील संबंधित कंत्राटदाराने वाद घातला होता. यासोबतच अर्थ विभागात देखील बिले काढण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येते. टक्केवारी न दिल्यास बिले काढण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार सूचना देऊनही बदल न झाल्यानेच ही बैठक घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अनेक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी असल्याचा मुद्दा सत्तार यांनी उपस्थित केला. तर पैसे मागणाऱ्या अधिकारी ईडी, सीबीआयच्या फेऱ्यात अडकू शकतात असं वक्तव्य सत्तार यांनी या बैठकीत केले.
सत्तारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या नेत्यांसह अनेकांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे ईडीच्या कारवायाच्या सतत चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान शासकीय कर्मचारी यांच्याकडून कामे करुन देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याने संतापलेल्या कृषी मंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांचे भर बैठकीत कान टोचले. एवढच नाही तर ईडीकडून जसे मोठमोठ्या लोकांवर कारवाई करते तसेच, पैसे मागणाऱ्या अधिकारी ईडी, सीबीआयच्या फेऱ्यात अडकू शकतात असे म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या: