Sanjay Shirsat On Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप-शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. फक्त 48 जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, "बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार...अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त 48 जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असते. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे!
मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये नवीन वाद पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार तर 48 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार असल्याचं बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळेंच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचे विपर्यास करण्यात आल्याचं म्हटले आहे.
मुनगंटीवार यांच्याकडून सारवासारव
बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून सारवासारव केली जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील 2024 च्या विधानसभेच्या जागावाटपाचा अजून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. तसेच याबाबत कोणतेही महिती माझ्या कानावर आलेली नाही. तर बावनकुळे काय बोलले याबाबत मला माहित नाही. पण आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप संदर्भात दोन्ही पक्षाच्या कोअर कमिटीत निर्णय होईल." तसेच जागावाटपाचा फार्म्युला त्या त्या पक्षाच्या क्षमतेवर ठरेल, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :