Chhatrapati Sambhaji Nagar News : मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने (Chhatrapati Sambhaji Nagar Bench) भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा मेहबूब शेख (Mahebub Shaikh) प्रकरणातील अर्ज फेटाळून लावत मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र याविरोधात चित्रा वाघ यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन, या दाव्याला आव्हान देणारा दिवाणी पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. मात्र छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या न्या. गौरी गोडसे यांनी चित्रा वाघ यांचा अर्ज फेटाळताना बीड दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढे काही दिवसांनी फिर्यादी महिलेनेच, आपण खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली पोलीस तपासात दिली. दरम्यान या काळात चित्रा वाघ यांनी शेख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली बदनामी केल्याचा दावा बीड दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. शेख यांचे फौजदारी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यांनी आपल्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा फेटाळण्यात यावा, असा अर्ज चित्रा वाघ यांनी दाखल केला होता. मात्र बीड दिवाणी न्यायालयाने वाघ यांचा अर्ज फेटाळला होता.
खंडपीठाने देखील फेटाळला अर्ज...
फिर्यादी महिलेने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे स्वतः तपासात सांगितले आहे. मात्र असे असताना चित्रा वाघ यांनी आपला बलात्कारी म्हणून उल्लेख केल्याने आपली मानहानी झाला असल्याचा आरोप करत, मेहबूब शेख यांनी आपली बदनामी केल्याचा दावा बीड दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. तर शेख यांच्याकडून आपल्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा फेटाळण्यात यावा, असा अर्ज चित्रा वाघ यांनी दाखल केला होता. मात्र बीड दिवाणी न्यायालयाने वाघ यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे चित्रा वाघ यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन, आव्हानित करणारा दिवाणी पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. पण बीड दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चित्रा वाघ यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया....
दरम्यान यावर मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "कायदा हातात घेऊन कायद्याच्या निर्णयाच्या अगोदरच स्वतःला शहाणे समजून निर्णयात्मक भूमिका घेऊन माझी बदनामी केली. चित्रा वाघ यांनी एखाद्याची बदनामी करताना हा विचार करायला पाहिजे होता की, इतरांच्या बदनामीसाठी पण कायदा असतो. माझी बदनामी केल्याने मी चित्रा वाघ यांच्याविरोधात 50 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. चित्रा वाघ यांनी हा अब्रू नुकसानीचा दावा योग्य नाही असा अर्ज दिवाणी न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात (औरंगाबाद खंडपीठ) आव्हान देणारा दिवाणी पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा अर्ज फेटाळून लावला. चित्रा वाघ यांना माहित नसावं इथे मनमानी कारभार चालत नाही. उठले की इतरांची बदनामी केली. पंगा महेबूब शेखसोबत आहे. त्यामुळे सगळं कसं कायद्याने होईल,” असे शेख यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :