Thackeray Group Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) इथे ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राहायचं की एकला चलो रेची भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आपली भूमिका जाहीर करेल, असं समजतं.
शिवसेना (Shiv Sena) नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर खदखद बोलून दाखवली
दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचीही बैठक काल (3 जुलै) पार पडली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्याने जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं समजतं.
उद्धव ठाकरेंची साथ देऊया, मनसेच्या (MNS) बैठकीत सूर
तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया, असा सूर मनसेच्या बैठकीत उमटला. राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे, कशी लढायची यावर त्यांनी नेत्याचं मत जाणून घेतलं. यावेळी उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. यावर राज ठाकरेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवारांचा राष्ट्रवादीत भूकंप
दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली राजकीय भूकंप झाला आहे. मागच्या वेळी भाजपकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना टार्गेट होती, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. भाजपला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात यश आलं आहे. अजित पवार यांनी आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी केली. अजित पवार याच्यासह राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
हेही वाचा