मुंबई : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांवर (Ajit Pawar) शुभेच्छांचा वर्षाव होतोय.  दरम्यान  'राज्यभरात पोस्टर लावताना शरद पवारांचा फोटो लावा असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल आहेत.  मात्र  राज्यात अनेक ठिकाणी अजित पवारांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीतून शरद पवारांना (Sharad Pawar) वगळल्याचं पाहायला मिळतंय.  अजितदादांच्या पोस्टरवर पवारांचे फोटो लावण्याच्या आदेशावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. 


 शरद पवार यांच्या नेतृत्वातीलच राष्ट्रवादी भाजप सोबत गेल्याच अजित पवार यांच्या गटाकडून दावा केला जात आहे.  आज सकाळी देवगिरी बंगल्यावर शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला पाठिंबा देणारे आमदार देखील उपस्थित  होते. या अगोदर ज्यावेळी अजित पवारांनी बंडाचा प्रयत्न केला त्यावेळी चार आमदार वगळता इतर सर्व आमदारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा असल्यामुळे निर्णय घेतल्याची सूत्रांनी  माहिती दिली आहे. त्यावेळी भाजप सोबत जाण्यासाठी तयार नसल्याने सही न करणाऱ्या आमदारांमध्ये रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांचा समावेश होता. 


फोटो लावण्याच्या आदेशावर कार्यकर्ते संतप्त


सोलापुरात जाहिरातीत अजित पवारांसह नवनिर्वाचित मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी दिलेल्या जाहिरातीत शरद पवारांना वगळण्यात आलंय.. अशाच पद्धतीने दिंडोरी नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश जाधव यांनी देखील जाहिरातीतून शरद पवारांना वगळलंय. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पोस्टरवर पवारांचे फोटो लावण्याच्या आदेशावर कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. अजित पवारांना शरद पवारांचे फोटो वापरण्याचा अधिकार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 


 अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला आहे.अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही ? असेही अजित पवार म्हणाले. 


अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना पाच तारखेचा अल्टिमेटम देण्यात आले आहे. 5 तारखेपर्यंत जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे वाट बघणार आहे. 5 जुलैच्या कार्यक्रमानंतर आणखी कोणाला नोटीस पाठवायची हे ठरणार आहे. 5  जुलै हा सर्व आमदारांना अल्टिमेटम  देण्यात आला आहे.  बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.