Maharashtra Lok Sabha Election Result 2024 मुंबई: मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात (Mumbai North West Election Result 2024) नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा निसटता पराभव झाला. मात्र या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निकालाच्याच दिवशी तक्रार दाखल केली होती आणि ईव्हीएम मशीनमधील मतदानाची फेर मोजणी करण्याची मागणी केली होती. यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर आरोप केले आहेत.


संजय राऊत नेमकं काय म्हणाले?


मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सूर्यवंशी यांनी काम पाहिले. त्या सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यांनी मतमोजणी दरम्यान अनेक कारनामे केले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांची गुलामी करणाऱ्या अधिकारी वंदना सूर्यवंशी यांना हा निकाल पचणार नाही. ही चोरी त्यांना पचणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. वंदना सूर्यवंशी यांचा प्रशासकीय इतिहास वादग्रस्त आहेत आणि अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं. तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, ही वंदना सूर्यवंशी यांची जबाबदारी आहे, असंही संजय राऊत म्हणाले. रवींद्र वायकर यांचा मित्रपरिवार मोबाईल घेऊन फिरत होता. त्यांना का रोखलं नाही?, या सर्वांना जाब द्यावा लागेल.  वंदना सूर्यवंशी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला आहे. त्या आपल्या कर्तुत्वाला जागल्या नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. अमोल किर्तीकर विजयी होते, अशी आमची खात्री आहे, असंही संजय राऊतांनी सांगितले. 


निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कोणतीच प्रतिक्रिया नाही-


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मत मोजणी केंद्रावरील निकालाच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज  मिळण्यास टाळाटाळ होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रावरील दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान जे काही घडले, त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची हालचाली होत नसल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप अमोल कीर्तिकरसह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. यासंबंधी राज्य निवडणूक आयोगाने केंद्र निवडणूक आयोगाला पत्र दिलं असून उत्तराच्या प्रतीक्षेत अमोल कीर्तिकर आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर अमोल कीर्तिकर  निवडणूक निर्णय अधिकारी दिलेल्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंबंधी कुठलीही प्रतिक्रिया न देता यासंबंधीचे सर्व आरोप झटकले आहेत. शिवाय मतमोजणी करणे आणि योग्य निर्णय देणे हे आमचं काम असून सुरक्षा संबंधित जबाबदारी ही पोलिसांची असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.


नेमकं काय घडलं?


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तिकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.  आता कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.