मुंबई : देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच पराभूत झालेल्या उमेदवारांना काही शंका असल्यास ईव्हीएम मशिनमधील मायक्रोचीप तपासण्याचे अधिकार मिळाले आहे. निकालामध्ये काही शंका असल्यास संबंधित मतदारसंघातील एकूण पाच टक्के ईव्हीएमच्या मायक्रोचीप तपासता येणार आहेत. पण त्यासाठी प्रत्येक ईव्हीएममध्ये 40 हजार रुपये भरावे लागणा. निवडणूक आयोगाच्या इंजिनियरसमोरच ही मायक्रोचीप तपासली जाईल.


दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना अर्ज करता येणार


निवडणूक आयोगाने नुकतंच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील गाईडलाईन्स पाठवली आहे. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना मतमोजणी संपल्याच्या सात दिवसाच्या आत त्यांना शंका असलेल्या बूथच्या ईव्हीएममधील मायक्रोचीप तपासण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 


हा अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल आणि त्यास मंजुरी मिळाल्यास निवडणूक आयोगाकडून पाठवलेल्या अभियंत्यांच्यासमोर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना शंका असलेल्या आणि अर्ज केलेल्या बूथवरील ईव्हीएमची मायक्रोचीप तपासता येणार आहे.


ईव्हीएम मायक्रोचीप तपासण्यासाठी 40 हजारांचा खर्च


पण मायक्रोचीप तपासायचे असेल तर उमेदवारांना मोठी रक्कमही खर्च करावी लागणार आहे. प्रत्येक ईव्हीएम आणि त्याच्या मायक्रोचीपच्या तपासणीसाठी उमेदवाराला चाळीस हजार रुपये भरावे लागणार आहे. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने 10 मशीनमधील मायक्रोचीप तपासण्याचं अर्ज केला असल्यास आणि त्याचा अर्ज मंजूर झाला तर त्याला चार लाख रुपये भरावे लागतील. 


लोकसभेचा निकाल मंगळवारी


देशातील 543 आणि राज्यातील 48 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का की इंडिया आघाडी बाजी मारून सत्ता स्थापन करणार याचा निकाल लागणार आहे. 


काँग्रेसचा भाजपवर आरोप


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठा आरोप केला. गृहमंत्री अमित शाहांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले अशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्टही टाकली. जयराम रमेश यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेत त्यांना पत्र लिहिले. केलेल्या दाव्यासंबंधीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. तसंच कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने धमकावल्याची तक्रार दिली नसल्याचंही आयोगाने नमूद केलंय.


निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते हा दावा कुठल्या आधारे करत आहेत याची माहिती देतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे 1आठवड्याचा वेळ मागितला. आयोगानं ही मागणी फेटाळली आणि आज 7 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. त्यावर निवडणूक आयोग निष्पक्ष असलं पाहिजे असा टोला जयराम रमेशांनी लगावला.


ही बातमी वाचा: