मुंबई: काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या तयारीत असलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासोबत  काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अशोक चव्हाण यांना मोठ्याप्रमाणावर काँग्रेस आमदारांचा गुप्तपणे पाठिंबा आहे.  या आमदारांनी अशोक चव्हाण यांना फोन केला तेव्हा सांगितले की, तुमची भूमिका योग्य आहे. आमचं तुम्हाला समर्थन आहे. पण आम्हाला आता लगेच काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. आमच्यावर पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे आम्ही योग्यवेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ, असा संदेश या आमदारांनी अशोक चव्हाण यांना दिल्याचे समजते. अशोक चव्हाण आज दुपारी १२ वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकरही भाजपमध्ये जातील. काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असला तरी तुर्तास ते योग्य वेळ येण्याची वाट पाहतील, असे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून आजच राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत अशोक चव्हाण गटातील आमदार महायुतीच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग  करण्याची शक्यता आहे.


अशोक चव्हाणांमुळे तो दरवाजा उघडला


अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केल्यामुळे काँग्रेसमधील अनेक नाराज आमदार आणि नेत्यांसाठी भाजपमध्ये जाण्याचे दरवाजे उघडे झाले आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवासियांना ही वाट मोकळी करुन दिली आहे. 


काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता


अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसचे अध्यक्षही सक्रिय झाले आहेत. राज्यातील  काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला फोन करुन तुम्ही भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये थांबणार, याविषयी विचारले जात आहे. तुर्तास काँग्रेसच्या उर्वरित आमदारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. 


आणखी वाचा


भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार; अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अडचण, समीकरण काय?


आधी म्हणाले अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पण प्लॅन अचानक बदलला; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची इतकी घाई का?