Maharashtra Cabinet Portfolio : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि. 15) पार पडला. यात उत्तर महाराष्ट्रातून (North Maharashtra) आठ मंत्र्यांना संधी देण्यात आली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय सावकारे तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. शपथविधी होऊन आठवडाभर उलटला तरी खातेवाटप जाहीर झाले नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात खातेवाटप कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर शनिवारी (दि. 21) सायंकाळी खातेवाटप करण्यात आले आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातील आठ आमदारांची वर्णी लागली. सिन्नरचे अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व दिंडोरीचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) या दोघांनी प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाजन हे फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्या पाठोपाठ धुळे येथून जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्या शिलेदाराला मंत्रिमंडळात बरोबर घेतले. तर भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तर शिवसेनेच्या विभाजनानंतर उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला उभारी देण्याचे काम दादा भुसे (Dada Bhuse) व गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निकटवर्तीयांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठली खाती मिळाली जाणून घेऊयात... 


उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कुठली खाती? 



  1. गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण) 

  2. राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) 

  3. संजय सावकारे - टेक्सटाईल 

  4. गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता 

  5. जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल 

  6. दादा भुसे -  शालेय शिक्षण 

  7. माणिकराव कोकाटे -  कृषी 

  8. नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन 


नंदुरबार जिल्हा प्रथमच मंत्रिपदापासून वंचित


दरम्यान, गेल्या 60 वर्षात नंदुरबार जिल्हा प्रथमच मंत्रिपदापासून वंचित राहिला. अनेक वर्षांपासून मंत्रिपदावर राहिलेले डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राजकीय धक्का मानला जात आहे. तर येवल्याचे छगन भुजबळ, अमळनेरचे अनिल पाटील यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे.


आणखी वाचा 


Maharashtra Cabinet Minister Post List: महायुतीचं मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; कोणाला कोणती खाती?, संपूर्ण यादी एका क्लिकवर