मुंबई: राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दृष्टीपथात आला आहे. शनिवारी मुंबईतील राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडेल. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदाची संधी मिळणार, याची माहिती समोर आली आहे. 'एबीपी माझा'च्या हाती लागलेल्या यादीनुसार, शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य संतुलन राखले आहे. 


विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंत्रि‍पदाच्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रि‍पदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळात शपथ घेतील, असे सांगितले जात होते. मात्र, तेव्हा इतरांना संधी देण्याच्या नादात या दोन्ही नेत्यांची संधी हुकली होती. त्यानंतर शेवटपर्यंत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांची मंत्री होण्याची इच्छा अपुरी राहिली होती. अखेर शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांना अनुक्रमे राज्य परिवहन महामंडळ आणि सिडकोचे अध्यक्षपद देऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली होती. मात्र, आता पुन्हा सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी न विसरता गोगावले आणि शिरसाट यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली आहे. याशिवाय, ठाण्यातील शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे या नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हे सगळेजण उद्या राजभवनात होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या सगळ्यांच्या वाट्याला कोणती खाती येणार, हे बघावे लागेल. 

दरम्यान, शिवसेना मंत्र्यांच्या संभाव्या यादीवर नजर टाकल्यास भाजपचा विरोध असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याचे दिसत आहे. भाजपने दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध केला होता. त्यामुळे या अनुभवी नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचे दिसत आहे. 


शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री


एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभुराज देसाई
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट 
गुलाबराव पाटील
भरत गोगावले


शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री


योगेश कदम
विजय शिवतारे
राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर



आणखी वाचा


मोठी बातमी: दिल्लीत अदानींच्या घरी भाजपचा केंद्रीय मंत्री आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?