मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटकपक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. जागावाटपाची ही बोलणी अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी भाजपच्या महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर आली आहे.भाजप लोकसभेच्या (Loksabha Election) एकूण 32 जागा लढवू शकते. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आपल्या लौकिकाप्रमाणे धक्कातंत्राचा पुरेपूर वापर केल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित चेहरे बाजूला सारुन नव्या नेत्यांना संधी दिली आहे. मुंबईतील भाजपच्या लोकसभा उमेदवारांची निवड करतानाही अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. 


यामध्ये सर्वाधिक धक्कादायक निर्णय म्हणजे भाजपकडून उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. गोपाळ शेट्टी हे भाजपचे मुंबईतील सर्वात ताकदवान खासदार मानले जातात. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे गोपाळ शेट्टींची उमेदवारी म्हणजे डोळे झाकून विजयाची खात्री, असे समीकरणच होते. परंतु, आता पियुष गोयल यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची व्यवस्था करण्यासाठी गोपाळ शेट्टी यांना लोकसभेच्या उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे. पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आहेत. तसेच ते मोदी-शाहांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. वडिलांपासून त्यांना भाजपच्या राजकारणाचा वारसा आहे. त्यामुळे पियुष गोयल यांना निवडून आणणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मुंबईतील भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या उत्तर मुंबईच्या जागेवरुन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


राहुल नार्वेकरांना लॉटरी, आशिष शेलारांना संयमाचे फळ मिळणार?


भाजपच्या संभाव्य उमेदवारी यादीतील आणखी दोन धक्कादायक नावे म्हणजे राहुल नार्वेकर आणि आशिष शेलार. यापैकी राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होतीच. नार्वेकर यांनी त्यादृष्टीने दक्षिण मुंबईचा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली होती. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी भाजपला अपेक्षित कामगिरी करुन दाखवली आहे. ते सध्या दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदारही आहेत. ते उच्चशिक्षित असल्यामुळे दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू मतदारांच्या पसंतीस उतरु शकतात. या सगळ्या गोष्टींमुळे नार्वेकर ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार ठरतील. हीच गोष्ट हेरुन भाजपकडून त्यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळू शकते.


याशिवाय, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचाही संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. आशिष शेलार यांना उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून रिंगणात उतरवले जाईल. पुनम महाजन येथील विद्यमान खासदार आहेत. परंतु, त्यांच्याविरोधात अँटी-इन्कम्बन्सी असल्याने भाजपने पुनम महाजन यांना बाजुला सारुन आशिष शेलार यांना उमेदवारी दिल्याचे मानले जाते. आशिष शेलार यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भाजपची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. अनेकदा त्यांना राज्यात मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा व्हायची. परंतु, दरवेळी त्यांची संधी हुकायची. परंतु, आता या सगळ्याची एकत्रित भरपाई करुन भाजप नेतृत्त्वाकडून आशिष शेलार यांना लोकसभेवर पाठवले जाऊ शकते. 


तर ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार मनोज कोटक यांनाच पुन्हा संधी द्यायचे ठरवले आहे. हा मतदारसंघ पूर्वी किरीट सोमय्या यांचा होता. परंतु, शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर किरीट सोमय्यांची उमेदवारी कापून भाजपने मनोज कोटक यांना खासदार केले होते. किरीट सोमय्या यांनी भाजपविरोधी नेत्यांचे घोटाळे उघड करुन त्यांच्यापाठी चौकशीचा ससेमिरी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे पक्ष त्यांच्या कामाची दखल घेईल, अशी अपेक्षा होती. परंतु, भाजप नेतृत्त्वाने त्यांना संसदीय जबाबदारीऐवजी अवांतर कामांसाठीच राखून ठेवणे पसंत केल्याचे दिसत आहे. 


आणखी वाचा


भाजपचं ठरलं! लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम, कोणता उमेदवार कुठे उभा राहणार? ही आहे संभाव्य उमेदवारांची यादी


मोठी बातमी : बीडमधून प्रीतम ऐवजी पंकजा मुंडेंना पसंती, मराठवाड्यातील सर्व जागांसाठी भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित!