Chhatrapati Sambhajinagar: महाविकास आघाडीकडे 10-12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते असल्याचा टोला 'काय झाडी, काय डोंगर..' फेम शहाजीबापूंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. उद्धव ठाकरे यांनी यंदा निवडणूक लढवत नसल्याचे सांगितल्यानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादी काय करते हेही पहायला मिळेल असेंही शिंदे गटाचे शहाजी पाटील (Shahaji Patil) म्हणालेत. पंढरपूर येथे दिवंगत नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त ते आज आदरांजली वाहायला आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलीय . 


उद्धव ठाकरेंनी केलेली युती तत्वहीन


एकतर उद्धव ठाकरे यांनी केलेली युतीच तत्वहीन असल्याचे सांगत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाचा पायाच उध्वस्त करत त्यांनी वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. तो शिवसैनिकांसाठी वेदनादायी होता असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंवर प्रेम असले तरी सच्चा शिवसैनिक स्वर्गिय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडणार नाही. असं आमदार शहाजी पाटील म्हणालेत.


विधानसभेसाठी मविआचा चेहरा कोण?


गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून राज्यात चर्चा सुरु असताना मुख्यमंत्रीपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठींबा देतो अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून ठाकरेंना घेरल्याचे दिसून आले. दरम्यान, काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.


उद्धव ठाकरेंच्या भाषणातील तीन मुद्दे



  • कोरोनाच्या काळात आम्ही खूप काम केले, म्हणूनच मुस्लिम आमच्यासोबत आले. एनआरसी आणि सीएए दरम्यान मुस्लिमांच्या मनात भीती होती, पण मी त्यावेळी म्हटलं होतं की, ज्याला देशावर प्रेम आहे, त्याला जाऊ देणार नाही, म्हणून मुस्लिम एकत्र आले.

  • मोदी नितीश आणि चंद्राबाबू नायडूंसोबत बसले तर आता त्यांनी हिंदुत्व सोडले असे मानावे का? केवळ वक्फ बोर्डातच नाही तर हिंदू मंदिरांच्या बाबतीतही जेपीसी चौकशी व्हायला हवी.

  • मराठा आरक्षणाबाबत तुम्ही लोकसभेत विधेयक आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. जरी त्यांनी आमचे धनुष्य आणि बाण चोरले, तरीही मी त्यांना जाळण्यासाठी मशाल पेटवली आहे.


हेही वाचा:


BJP MLA Prasad Lad on Uddhav Thackeray : ‘दोन हाना, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था; मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून भाजपची जोरदार टीका