मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता अवघे तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत मविआची (MVA Alliance) बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपाची प्राथमिक बोलणी झाली होती. यानंतर आज एक अपडेट समोर आली आहे. 


आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीत प्रत्येकी 96-96-96 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीत 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. लोकसभेत सर्वात चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राईक रेटनूसार जागावाटप व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते. या आठवड्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष ते लढवू इच्छित असणाऱ्या विधानसभा जागांची माहिती एकत्रित करतील. त्यानंतर पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची एकत्रित मुंबईत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागा वाटपांचा तिढा लवकरात लवकर सोडवून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. 


ठाकरे गटाला मुंबई जास्त जागा


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद कोणत्या भागात आहे यावरुन जागावाटप आणि मतदारसंघ ठरवले जातील. त्यानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत ठाकरे गटाच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात. शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्त जागांची मागणी करेल, असा अंदाज आहे.


लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश-


लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर मविआचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या अजस्त्र यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील, याबाबत साशंकता होती. मात्र, मविआने 30 जागा जिंकत या सर्व शंका-कुशंका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला आहे. यासाठी महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.