छत्रपती संभाजीनगर: राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी आमचे सर्वेक्षण सुरु आहे. एकूण सहा टप्प्यात हे सर्वेक्षण होईल. त्यानंतर 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन कोणत्या जागांवर ताकदीने निवडणूक लढवायची, हे निश्चित केले जाईल. आतापर्यंत आम्ही विधानसभेच्या 127 जागांची चाचपणी केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली. ते शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधून बीडच्या दिशेने निघाले असताना 'एबीपी माझा'शी बोलत होते. 

Continues below advertisement

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज एकत्रित येऊन कशाप्रकारे निवडणूक लढवू शकतो, याबाबत ढोबळ माहिती दिली. मराठा समाजाविरोधात काड्या करणाऱ्यांना आणखी दोन-चार महिन्यांनी आम्ही घरी पाठवू. ते आम्हाला खड्यात घालणार असतील तर आम्ही त्यांना 100 टक्के बुडवणार. राज्य सरकारमधील आठ ते नऊ मंत्री मराठाद्वेष्टे आहेत, ते मराठ्यांविरोधात काड्या करत असतात. दंगली झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करतात. या सगळ्यांचा आम्ही विधानसभा निवडणुकीला ठरवून कार्यक्रम करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

विधानसभेला किती जागांवर मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार?

राज्य सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही पूर्वीसारखे रडत बसणार नाही. आधी सरकारनेच सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायदेतज्ज्ञ आणले. आता तुम्हीच हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, अशी भाषा सुरु केली आहे. पण आता आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडतच असतो. आता आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू. एकदा आम्ही गेम केला आहे आता पुन्हा एकत्र जमून गेम करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. 

Continues below advertisement

आतापर्यंत आम्ही राज्यातील 123 ते 127 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. आमचे सर्वेक्षणाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील काही जागांवर चाचपणी करण्यात आली आहे. सहा टप्प्यात 288 जागांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही किती जागांवर फोक ठेवायचा, हे ठरवू. आपल्या किती जागा जिंकणार, हे आम्ही ठासून सांगू, आमचा एक्झिच पोलच वेगळा असणार आहे. वेळ पडली तर आम्ही सगळे चर्चा करुन 288 जागांवर मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे की 288 जागांवर उमेदवार पाडायचे, हे ठरवू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

ओबीसींचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनाला जातात तसे मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना आलं पाहिजे, अन्यथा.... जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनाही इशारा दिला. विरोधी लोक बोंबलत आहेत, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा नेता बोंबलत आहे. मराठ्यांनी मतं देऊनही ते तुमच्या छाताडावर पाय देत आहेत. तुम्ही मतदान करुनही त्यांना जातीचा इतका स्वाभिमान असेल तर मग तुम्हाला का नसावा?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना विचारला. त्यांचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनात जात असतील तर आता मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आलं पाहिजे. आम्हीही आमच्या जातीच्या मोर्चात जाऊ, असे मराठा नेत्यांनी सांगितले पाहिजे. अन्यथा या नेत्यांनाही निवडणुकीत मराठा समाज पाडेल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. 

आणखी वाचा

सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हाला पाजतील; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा