Maha Vikas Aghadi : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. पण इंडिया आघाडीच्या बैठकीत अपमान झाल्याचा आरोप धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीची बैठक सुरु असताना बाहेर जायला सांगितलं. तासभरापासून बाहेरच उभं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
वचिंत बहुजन आघाडीला सलग दुसऱ्या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित न राहता या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे उपस्थित राहिले. वचिंत बहुजन आघाडीची भूमिका या बैठकीत मांडण्यासाठी पुंडकर उपस्थित होते. नरीमन पाँइट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात झाली असताना वंचित बहुजन आघाडीचे पुंडकर यांना पक्षाच्या वतीने त्यांची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीवेळ बाहेर जाण्यास सांगितलं. साधारणपणे एककीकडे महाविकासआघाडीची बैठक सुरु असताना तासभर पुंडकर बाहेर बसले होते.महाविकास आघाडीची ही वागनूक अपामानास्पद असल्याचे वाटल्याने त्यांनी बैठकीतील कुठल्याही नेत्याशी संवाद न साधता काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली.
कॉमन मिनिमम प्रोग्राम आधी ठरवा -
आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडली. शेतकऱ्यांचे हमीभावाचा प्रश्न आहे, त्याशिवाय युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असे 25 मुद्दे आहेत. महाविकास आघाडीने आम्ही त्यांचा घटक पक्ष आहोत असा पत्रात उल्लेख करून ते पत्र आम्हाला द्यावे. आम्हाला फक्त महाविकास आघाडीने बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे. आम्हाला जागावाटपाचा फॉर्मुला त्यांनी विचारला, आम्ही आधी सांगितले की कॉमन मिनिमम प्रोग्राम आधी ठरवावा, असे पुंडकर म्हणाले.
12-12-12-12 चा फॉर्मुला वापरावा
कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकमत झाल्यानंतरच आपण निवडणूक एकत्रित लढवण्यावर विचार करू शकतो. त्यांच्यातलीच जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप पूर्ण झाली नाही. महाविकास आघाडीचे अजून ठरलेलं नाही तर आम्ही आमची भूमिका कशी मांडायची? जर तुमचं ठरत नसेल तर सर्व पक्षांनी 12-12-12-12 चा फॉर्मुला वापरावा, अशी आमची भूमिका आहे, असे पुंडकर म्हणाले.
नाराज होऊन बैठकीतून बाहेर पडलो -
महाविकास आघाडीची बैठक सुरु असतानाच आम्हाला अचानक बाहेर जायला सांगितलं. मागील एक तासापासून मला बाहेर बसवण्यात आलेय. हा एक प्रकारे आमचा अपमान आहे. आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीमध्ये अपमान होत आहे. आम्ही नाराज होऊन बैठकीतून बाहेर पडलो आहोत, असे पुंडकर म्हणाले.