पंढरपूर: माढा लोकसभा मतदारसंघात सध्या अफवांचा बाजार जोरात सुरु झाला असून यामुळे रोज नव्या चर्चांना पेव फुटू लागले आहे . काल दिवसभरात महादेव जानकर यांनी मोहिते पाटील आणि संजीवबाबा निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियात नवनवीन चर्चेला सुरुवात झाली . महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला शरद पवार यांनी माढा लोकसभा (Madha Loksabha) देण्याची उघड ऑफर सुरुवातीपासून दिल्याने त्यांनी काल भाजप आणि अजित पवार गटातील नाराज निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती . मात्र, माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याने गेल्या पाच दिवसांपासून मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यात गावभेट दौरे करीत आहेत . 


माढा लोकसभा मतदारसंघावरुन निर्माण झालेला हा तिढा सध्या महायुतीसाठी विशेषत: भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. लोकसभेला भाजपकडून  उदयनराजे यांना उमेदवारी दिली जाणार व माढा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडणार या अफवेने सोशल मीडियात चर्चा रंगू लागली . यामुळे रणजित निंबाळकर यांची उमेदवारी जाऊन राष्ट्रवादीचे संजीवबाबा निंबाळकर याना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरु झाल्या . मात्र, काल रामराजे यांनी बोलावलेल्या मेळाव्यात आपली नाराजी अजित पवार याना सांगू आणि ते देतील तो निर्णय मान्य करू मात्र तोपर्यंत कोणीही तुतारी , मशाल हाती धरण्याची भूमिका घेऊ नका, असा स्पष्ट शब्द घेतला आहे. माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे बंदी संजीवबाबा निंबाळकर हे देखील उत्सुक आहेत . या मेळाव्यात त्यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असा संकेत देत खासदार रणजित निंबाळकर यांनी त्यांच्या भूमिकेत बदल केल्यास विचार करता येईल, असेही सांगितल्याने दोन निंबाळकरांमध्ये येत्या दोन दिवसात महायुतीतील नेते अजितदादा व फडणवीस हे सलोखा घडवून आणू शकतात . 


राष्ट्रवादीकडून नारायण पाटलांना उमेदवारी?


दुसऱ्या बाजूला काल करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक आमदार संजयमामा शिंदे हे दोघेही एका गाडीतून मुंबईला गेले आणि तिढा सोडवण्यासाठी नारायण पाटील यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, नारायण पाटील यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी ते पुणे येथील दवाखान्यात असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले . यानंतर मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात चर्चा सुरु झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या . याला उत्तम जानकर यांनी खतपाणी घालताना अशा चर्चा आमच्या कॉमन कार्यकर्त्यांमध्ये सुरु असल्याचे सांगितल्याने  माढा लोकसभा मतदारसंघात अजून बराच गुंता होत असल्याचे दिसत आहे . 



माढ्यात शिंदे गटाकडून 'आमचं ठरलंय'चा नारा


यातच आता माढा लोकसभा मतदारसंघातील शिंदे सेनेची नाराजी समोर येऊ लागली असून येत्या रविवारी माढा लोकसभेसाठी 'आमचे ठरलंय' अशा टायटलखाली शिवसैनिकांचा मेळावा संपर्क प्रमुख प्रा शिवाजी सावंत यांनी बोलावलं आहे . शिवाजी सावंत हे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू असून माढा , करमाळा परिसरात त्यांची मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे . शिवाजी सावंत हे देखील भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्यावर नाराज असल्याने त्यांची नाराजी दूर करायचे कामही आता भाजप नेत्यांना करावे लागणार आहे . एका बाजूला शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू खंबीरपणे खासदार निंबाळकर यांच्यामागे उभे असताना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नाराजीने निंबाळकर यांच्या अडचणी वाढणार आहेत . आपणच माढा लोकसभेचा भाजप उमेदवार असून आपली उमेदवारी कापली जाणार नसल्याचा दावा निंबाळकर करीत असले तरी रोज समोर येणाऱ्या नवनवीन डोकेदुखी समोर भाजप काय भूमिका घेणार हेही पाहावे लागणार आहे . 


शरद पवार माढ्यात कोणती चाल खेळणार?


सध्या सर्वांची नजर शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे लागून राहिले असून जोपर्यंत पवार उमेदवारी घोषित करीत नाहीत तोपर्यंत भाजपाला रोज नवनवीन नाराजांची समजूत काढत बसावे लागेल . शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आणि धुरंधर नेते असून त्यांच्या खेळ्यांपुढे भाजपचे चाणक्य क्लीन बोल्ड होताना दिसत आहेत . जे गेल्यावेळी भाजप आणि निंबाळकर यांच्यासोबत होते त्यांच्यातील नाराजी भाजपासाठी डोकेदुखी बनत चालली आहे . धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण भाजपमध्ये असून मतदारसंघातील परिस्थिती पक्षश्रेष्ठींसमोर ठेवणार असल्याचे सांगत आहेत. आपला पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांवर विश्वास असल्याचे मोहिते पाटील सांगत असल्याने आता पक्ष मोहिते पाटील यांच्या नाराजीवर उपाय शोधणार का, त्यांना वेगळा पर्याय देणार हेही येत्या दोन दिवसात समजणार आहे . 


आणखी वाचा


प्लॅन होता बारामतीत 'हबकी' डाव टाकण्याचा; पण 'टांग' लागली माढा, मावळ, शिरुर, सातारपर्यंत?