पंढरपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक असणाऱ्या माढा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंजक आणि वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. माढ्यात (Madha Lok Sabha) भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते. मात्र, या नाराजीची भाजपकडून दखल न घेण्यात आल्याने धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आता कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात  आहे.


या पार्श्वभूमीवर माढ्याची जागा वाचवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर (Uttam Jankar) हेदेखील तुतारी हाती धरतील असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले आहे. 


उत्तम जानकर यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे विशेष विमान बारामती विमानतळावर पाठवण्यात येणार आहे. या विमानाने उत्तम जानकर हे मुंबईत उतरतील आणि देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील. याठिकाणी प्राथमिक चर्चा करुन देवेंद्र फडणवीस उत्तर जानकर यांना थेट दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आता सागर बंगला आणि दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीवेळी उत्तम जानकर यांच्यासमोर भाजपकडून कोणता प्रस्ताव ठेवला जाणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


उत्तम जानकर भाजपसाठी इतके महत्त्वाचे का?


2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत उत्तम जानकर अवघ्या 2000 मतांनी पडले होते. सोलापूर आणि माढ्यात उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उत्तम जानकर हे आमच्यासोबत आले तर आम्ही माढा लोकसभेची निवडणूक 1 लाख 30 हजारांच्या मताधिक्याने जिंकू, असे मध्यंतरी जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तम जानकर यांना भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता उत्तम जानकर काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


धैर्यशील मोहिते पाटील पवारांना भेटले, माढा उमेदवारीवर अभयसिंह जगताप, प्रवीण गायकवाड काय म्हणाले?